चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या संभाषणादरम्यान, भारताने, सीमावर्ती भागातील उर्वरित भागात लष्कर लवकर आणि पूर्णपणे मागे घेण्याची गरज आहे जेणेकरून द्विपक्षीय संबंध नैसर्गिक मार्गावर परत येऊ शकतील, असे म्हटले आहे. शांतता प्रस्थापित केल्याने परस्पर विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे भारताने सांगितले.
२०२० च्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंमधील संघर्षानंतर सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा आहे. दोन्ही देशांनी सीमा विवाद सोडवण्यासाठी अनेक वेळा चर्चा केल्या आहेत. भारताने पूर्व लडाखमध्ये पूर्णपणे सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजित डोवाल आणि वांग यांच्यात आजची चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाली.
शुक्रवारी अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले की लडाखच्या उर्वरित भागातून सैन्य तात्काळ मागे घेण्यात यावे, त्याशिवाय द्विपक्षीय संबंध सामान्य होणार नाहीत. सीमेवर शांतता प्रस्थापित करूनच परस्पर विश्वास वाढेल.सध्याची परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नाही. चीनचे परराष्ट्र मंत्री यी यांनी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी वैयक्तिक आणि नंतर प्रातिनिधिक पातळीवर चर्चा केली.
“संबंध सामान्य करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सकारात्मक संवाद ही पूर्वअट आहे. कोणत्याही कृतीतून दोन्ही देशांच्या सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे डोवाल म्हणाले. चर्चा पुढे नेण्यासाठी चीनने अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत डोवाल म्हणाले की, तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर ते चीनला भेट देऊ शकतात.
चीनचे परराष्ट्र मंत्री यी यांचे गुरुवारी दिल्लीत आगमन झाले. करोना महामारीच्या नंतर दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा सुरू करणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश आहे. या वर्षी होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बीजिंग बैठकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित करणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. चर्चा सुरू होण्यापूर्वी त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना उद्देशन ट्विट हैदराबाद हाऊसमध्ये वांग यी यांचे स्वागत आहे, असे म्हटले आहे.
वांग यी यांनी दिल्लीला पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) च्या बैठकीत भाग घेतला. तिथे ते म्हणाले की, काश्मीरवर आज आम्हाला आमच्या अनेक इस्लामी मित्रांचा आवाज पुन्हा ऐकू आला. चीनलाही हीच अपेक्षा आहे. तथापि, भारताने काश्मीरवरील त्यांचे वक्तव्य फेटाळून लावले आणि म्हटले की चीनसह इतर देशांना आपल्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा अधिकार नाही.
लडाखमध्ये मे २०२० पासून दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू आहे. त्यानंतर चीनच्या वरिष्ठ नेत्याची ही पहिलीच भारत भेट आहे. गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले होते की, चीनसोबतचे भारताचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर, दोन्ही देशांमध्ये सीमावाद सोडवण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. लडाखमधील सर्व तणावग्रस्त भागातून लष्कर पूर्णपणे मागे घेण्यावर भारत ठाम आहे.
या महिन्यात ११ मार्च रोजी, चुशुल-मोल्डो सीमा चौकीवर दोन्ही देशांमधील लष्करी कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चेची १५ वी फेरी झाली. यामध्ये, दोन्ही बाजूंनी पश्चिम सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरक्षा आणि स्थिरता राखण्यास सहमती दर्शवली होती.