किचकट कर्ज प्रक्रियेमुळेच देशातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारवर टीका केली. गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात आंतरराष्ट्रीय कृषी परिसंवादाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
आपल्याकडील कर्जप्रक्रिया अतिशय किचकट आहेत, त्यातही शेतकऱ्यांना कर्ज घेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. हे कर्ज मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या मागचे दुष्टचक्र संपत नाही आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. आपल्या देशात गेल्या २० वर्षांत तब्बल दोन लाख ७० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार बँकिंग व्यवसाय आणि नाबार्डचे गोडवे गाते, मात्र आजही देशातील ३० टक्क्य़ांपेक्षा कमी शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळू शकते. उर्वरित शेकऱ्यांना सावकारांपुढे हात पसरण्यावाचून पर्याय नसतो आणि सावकारांच्या भरमसाट व्याजदरामुळे त्यांचे जगणे कठीण होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कर्ज योजना बनविण्याची गरज असून तसे केले तरच आपले शेतकरी वाचू शकतील, असे ते म्हणाले.
अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करणे शेतकऱ्यांना शक्य नसून देशभरात दररोज सुमारे पंचवीसशे शेतकरी शेती सोडून अन्य पर्यायांकडे वळत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात अन्नटंचाईचे संकट आपल्यासमोर उभे ठाकेल, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधानांवर टीका
पेप्सी, कोला आणि फँटासारख्या शीतपेयांमध्ये किमान पाच टक्के फळांचा रस घालण्याची कायदेशीर सक्ती करण्यात यावी, अशी सूचना दोन वर्षांपूर्वी मी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना केली होती, मात्र आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावामुळे त्यांनी ही कल्पना धुडकावली. या कंपन्यांना अशी सक्ती केली असती तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असता, असे ते म्हणाले.
अन्य देशांशी तुलना
नेदरलँडमध्ये प्रति हेक्टर कृषी क्षेत्रात सुमारे नऊ टन गहू पिकतो तर आपल्याकडे हेच प्रमाण केवळ पावणेतीन टन आहे. पेरुसारख्या लहान देशात प्रति हेक्टर कृषी क्षेत्रात सव्वाशे टन ऊसाचे उत्पादन होते तर भारतात हे प्रमाण निम्मे आहे, असे मोदी यांनी सांगितले.
बादल यांच्याकडून स्तुती
या संमेलनाला उपस्थित असलेले पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांचे तोंड भरुन कौतुक केले. गुजरातने महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांच्यासारखे थोर नेते देशाला दिले आहेत, आता याच मातीतून मोदी यांच्यासारखा मोठा नेता पुढे आला आहे, सध्याच्या घडीला नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे नेते आहेत, असे ते म्हणाले. केंद्र सरकारला तसेच कोणत्याही मुख्यमंत्र्याला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मोदींनी मात्र हे संमेलन आयोजित करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींचे कौतुक केले. केंद्र सरकारची अनास्था व चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्र सर्वाधिक दुर्लक्षित व उपेक्षित क्षेत्र ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complicated process of loans to farmers lead suicide
Show comments