हिऱ्याच्या वायरमधून माहिती वाहून नेता येते असे दिसून आले असून या गुणधर्माचा वापर हिऱ्याचा वापर असलेले संगणक तयार करण्यासाठी होऊ शकतो.
पारंपरिक वायरमधून जसे इलेक्ट्रॉन वाहून नेले जातात तसे हिऱ्याच्या वायरमध्ये होत नाही, त्यात इलेक्ट्रॉन जागेवरच राहतात व त्यांचा जो स्पिन म्हणजे फिरणे असते त्यामुळे निर्माण होणारा चुंबकीय परिणाम एकमेकांकडे पाठवला जातो.
हिऱ्यात इलेक्ट्रॉन स्पिनचा वापर करून संगणकीय मंडलातील माहिती वाहून नेली जाते. ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी येथे केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, धातूंपेक्षा हिऱ्यात स्पिनचे वहन जास्त चांगले होते.
जगातील संशोधक स्पिंट्रॉनिक्स या नवीन विज्ञान शाखेत काम करीत असून त्यांच्या मते हिऱ्याच्या वायरींमुळे संगणक अधिक वेगवान होऊ शकतील. स्पिंट्रॉनिक्समध्ये हिऱ्याला फार महत्त्व आहे, असे सांगून प्रमुख संशोधक ख्रिस हॅमेल यांनी सांगितले की, हिरा कठीण पारदर्शक असतो व आम्लांचा त्यावर काही परिणाम होत नाही. अर्धवाहकांप्रमाणे तो उष्णता धरूनही ठेवत नाही. हिऱ्याच्या वायरची किंमत ही हिऱ्याच्या अंगठी इतकी महाग नसेल.
वायर १०० डॉलरला..
कृत्रिम हिऱ्यापासून बनवलेली वायर फार तर १०० डॉलरला पडेल. कालांतरान हिऱ्याचे ट्रान्झिस्टर नावाचे कंपोनंट तयार करता येतील. हिऱ्याची लहान वायर तयार करताना हॅमेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी छोटय़ा हिऱ्याच्या वायरचा वापर मॅग्नेटिक रेझोनन्स फोर्स मायक्रोस्कोपसाठी केला तेव्हा त्यांना वायरमधील स्पिन अवस्था बघता आल्या.
वायरवर नायट्रोजन अणूंचा मारा केला तरच हिऱ्याच्या वायरमधील जोडी नसलेले इलेक्ट्रॉन फिरू शकतात. ३० लाख हिऱ्याच्या रेणूवर १ नायट्रोजन अणू टाकला तरी पुरेसे असते.
वैज्ञानिकांनी हिऱ्याच्या रेणूतील इलेक्ट्रॉनच्या स्पिनचे निरीक्षण केले आहे. यात वापरलेली वायर ही चार मायक्रोमीटर लांब व २०० नॅनोमीटर रूंद होती. सूक्ष्मदर्शकात चुंबकीय वेटोळे बसवून इलेक्ट्रॉनचा १५ नॅनोमीटरचा फोटो घेऊन इलेक्ट्रॉनचे वर्तन टिपले जाते.
या इलेक्ट्रॉनची स्पिन अवस्था मध्यापेक्षा टोकाकडे जास्त काळ टिकल्याचे दिसून आले. नेचर नॅनोटेक्नॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा