गेले काही दिवस स्वपक्षीयांवर टीका करण्यात गुंतलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे गांधी घराण्याला लक्ष्य केले. स्वामी यांनी गांधी घराण्याचे जावई असलेल्या रॉबर्ट वडेरा यांना ट्विटरवरील प्रतिक्रियेवरून लक्ष्य केले आहे. रॉबर्ट वडेरा यांनी राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा जेलबाहेर कसे राहता येईल, हे पाहावे, असा खोचक टोला स्वामी यांनी लगावला.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलेल्या पेहरावावर टीका करताना स्वामी यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे ‘वेटर’ म्हणून संबोधले होते. वडेरा यांनी स्वामींच्या या वक्तव्याचा समाचार घेताना वेटरला काही प्रतिष्ठा नसते का, असा सवाल ट्विटरवरून उपस्थित केला . स्वामींचे हे वक्तव्य उपजीविकेसाठी मेहनत करणाऱ्या वेटर्सचा अपमान करणारे असल्याची प्रतिक्रिया वडेरा यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, बिकानेर येथील जमीन व्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) रॉबर्ट वडेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीविरुद्ध नव्याने समन्स जारी होण्याची शक्यता आहे. ‘ईडी’कडून या कंपनीला आर्थिक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा