मुंबईत गुरुवारी संध्याकाळी २३ वर्षीय महिला छायापत्रकारावर झालेल्या पाशवी बलात्काराचे शुक्रवारी राज्यसभेत तीव्र पडसाद उमटल़े या वेळी प्रक्षुब्ध सदस्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली, तर शासनाने गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन देत वेळ मारून नेली़
सत्ताधारी पक्षाचे खासदार विजयलक्ष्मी साधो यांनी भाजपशासित मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा आरोप केला़ त्यामुळे काही काळ भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली़ विरोधी पक्षाच्या खासदाराने या वक्तव्याचा उभे राहून समाचार घेण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच बलात्काराच्या घटनेला राजकीय रंग देत असल्याचे म्हटल़े
यावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी असल्याचे असल्याचे नमूद करीत केंद्रीय गृह राज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी, महाराष्ट्र शासनाकडून याबाबतची सविस्तर माहिती मागविल्याचे सांगितल़े तसेच या प्रकरणी महाराष्ट्र शासनाला आरोपींना तातडीने अटक करावी आणि त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशा सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल़े
दरम्यान, शून्य प्रहराच्या काळात भाजपच्या सदस्या स्मृती इराणी यांनी सातत्याने होणारे हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने काया पावले उचलली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला़ दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा करण्यात येत असल्याचे आश्वासन देण्यात आले होत़े मात्र त्यानंतरही अशा घटना घडत असल्याचे त्यांनी नमूद केल़े अशा घटना घडल्या की केवळ निषेध व्यक्त करण्यात येतो़ महिलांवरील अत्याचाराबाबत आपण अजून किती काळ गप्प राहून बघ्याची भूमिका घेणार, असा प्रश्नही इराणी यांनी उपस्थित केला़ यापूर्वी मुंबईत महिलेवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आणि अमेरिकी महिलेवर रेल्वेत झालेल्या चाकू हल्ल्याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली़
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची चौकशी समिती
मुंबईतील लोअर परेल येथे गुरुवारी रात्री २३ वर्षीय छायापत्रकार महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडून एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आह़े कौन्सिलचे सदस्य राजीव साबडे या प्रकरणातील महाराष्ट्र शासनाची बाजू, पीडित महिलेची बाजू आणि इतर सर्व बाबींचा बारकाईने तपास करतील आणि लवकर आपला अहवाल सादर करतील, असे कौन्सिलचे अध्यक्ष मार्कन्डेय काटजू यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आह़े
मुंबई बलात्काराचा सर्वपक्षिय निषेध
मुंबईतील बलात्काराच्या घटनेचा शुक्रवारी नवी दिल्लीत सर्वपक्षिय नेत्यांनी निषेध केला़ याचा निषेध करताना केंद्रीय दूरसंचार आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी, अशा घटना कठोरतेने हाताळायला हव्यात, असे संसदे बाहेर बोलताना सांगितल़े आपल्या स्त्रीया – मुलांना अशा असुरक्षिततेत जीवन जगावे लागणे, योग्य नसल्याचेही ते म्हणाल़े
या घटनेला दुर्दैवी असे संबोधत लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी म्हटले आहे की, डिसेंबरमधील दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या वेळेला नवे विधेयक संसदेत मांडण्यात आले होत़े त्याची या प्रकरणात अंमलबजावणी होईल, अशी आशा आह़े़
भाजप नेते नजमा हेप्तुल्ला यांनी, देशात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही़ लोकांच्या मनात कायद्याचे भय राहिलेले नाही, अशी टीका करीत या घटनेचा निषेध केला़
बसपाच्या प्रमुख मायावती यांनी, देशातील अशा घटना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कठोर पावले उचलावीत, असे म्हटले आह़े
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, याबाबत सरकारला दोषी धरत मुंबई- पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळल्याचा आरोप केला़ तसेच महिला आणि शाळकरी मुलीसुद्घा सुरक्षित नसल्याचे म्हटले आह़े
केंद्राने मुंबई पोलिसांकडून अहवाल मागविला
या घटनेला ‘अत्यंत दुखद आणि दुर्दैवी’ असे संबोधत केंद्र शासनाने मुंबई पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल मागविला आह़े ‘मुंबईतील घटना ही त्या राज्याच्या अखत्यारीतील आह़े तरीही मी मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो आह़े तपास सुरू आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना सांगितल़े