कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आजारपणातून लवकरात लवकर बऱया व्हाव्यात, यासाठी त्यांना शुभेच्छा देतानाच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून हळूच त्यांना चिमटा काढला. 
सोनिया गांधी यांना सोमवारी संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने संसद भवनातून दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास रुग्णालयातून सोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करून सोनिया गांधी यांना आजारातून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनिया गांधी यांना संसद भवनातून रुग्णालयात नेताना प्राथमिक वैद्यकीय सुविधेचा वापर का केला गेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांना संसदेतून रुग्णालयात नेताना व्हिलचेअर किंवा स्ट्रेचर वापरले असते, तर अधिक बरे झाले असते. त्यांच्या तब्यतीचा विचार करता, त्यांना सुसज्ज रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्याची गरज होती, असेही मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात डॉक्टरच योग्य काय ते सांगू शकतील, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.