डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि स्वतःला राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार माननाऱ्या जो बायडेन यांचा आरोग्याविषयी काळजी वाढविणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच इटलीमध्ये जी७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान जागितक नेते एका ओळीत उभे असताना जो बायडेन भलतीकडेच चालत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता फिलाडेल्फिया चर्चमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ८१ वर्षीय बायडेन यांनी पेनसिल्वेनिया येथील प्रचार संपल्यानंतर चर्चला भेट दिली होती. यावेळी पाद्रीने प्रार्थनेनंतर सर्वांना उभे राहण्याची विनंती केली. तेव्हा बायडेन २५ सेकंद बसूनच राहिले.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादविवादाचा कार्यक्रम झाल्यानंतर ही घटना आता समोर आली आहे. यावेली चर्चमध्ये ते निस्तेज बसून राहिल्याचे दिसते.
तत्पूर्वी ईशान्य फिलाडेल्फियामधील क्राइस्ट येथील माऊंट आयरी चर्च ऑफ गॉडमध्ये बायडेन यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. चर्चमध्ये केलेल्या भाषणात ते म्हणाले की, अमेरिकेला पुन्हा एकदा एकत्र करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. चर्चमध्ये ३०० उपस्थितांसमोर भाषण करताना बायडेन म्हणाले, मी हे काम बऱ्याच वर्षांपासून करत आहे. मी देवाशी प्रामाणिक आहे. जर आपण एकत्र राहिलो तर नक्कीच अमेरिकेच्या भविष्याबद्दल मी आशावादी आहे. आम्हाला अमेरिकेचा सन्मान परत मिळवायचा आहे.
बायडेन सेवा करण्यास अयोग्य आहे?
दरम्यान, चर्चमधील बायडेन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. “बायडेन यांना उभे राहायचे आहे की नाही? हे कळायला मार्ग नाही. डेमोक्रॅटिकना यात काही अडचण वाटत नाही का?”, असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, त्यांना स्मृतीभ्रंष आणि पक्षाघाताचा आजार आहे. ते अमेरिकेला सेवा देण्यास अयोग्य आहेत.
इटलीमध्ये काय झाले होते?
जो बायडेन जी-७ परिषदेसाठी इटलीमध्ये दाखल झाले होते. या परिषदेच्या निमित्ताने १३ जून रोजी इतर राष्ट्रप्रमुखांसंह परिषदेच्या ठिकाणी बाहेर मोकळ्या जागेत फोटोसेशन चालू होते. यावेळी इतर सर्व राष्ट्रप्रमुख फोटोसाठी एकत्र उभे असताना नेमके त्याचवेळी जो बायडेन मात्र भलतीकडेच पाहात होते. एवढेच नाही तर ते उभ्या असलेल्या जागेवरून डावीकडे वळून काही अंतर चालतही गेले. नंतर त्या बाजूला तोंड करून ते उभे राहिले.
जो बायडेन तिकडे तोंड करून उभे असताना इकडे इतर राष्ट्रप्रमुख त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहात होते. त्यात यजमान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चॅन्सेलर ओलफ शोल्झ, युरोपियन युनियनचे अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन अशा दिग्गज नेत्यांचा समावेश होता!