पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासंबंधी, तसेच हिंद-प्रशांत महासागरी प्रदेशामध्ये सहकार्याला चालना देण्यासंबंधी सोमवारी करार करण्यात आला. भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिास्तोफर लक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यासंबंधी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या भारतविरोधी कारवायांकडे लक्सन यांचे लक्ष वेधले.
मोदी आणि लक्सन यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान सहा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामध्ये संरक्षणासह शिक्षण, क्रीडा, कृषी आणि हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच संरक्षण उद्याोग क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी आराखडा तयार करण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांनी हिंद-प्रशांत महासागर प्रदेशात स्वायत्तता आणि प्रादेशिक अखंडतेचे समर्थन करत असल्याचे जाहीर केले. दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धावरही चर्चा केली. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करून शांतता प्रस्थापित केली जावी यावर सहमती दर्शवली.
लक्सन यांचे रविवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झाले. दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्याला चालना देणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश आहे. रविवारी भारत व न्यूझीलंडदरम्यान मुक्त व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्यात आल्या.
भारत आणि न्यूझीलंड मुक्त, खुल्या, सुरक्षित आणि समृद्ध हिंद-प्रशांत प्रदेशाला पाठिंबा देतात. आमचा विकासाच्या धोरणावर विश्वास आहे, विस्तारवादावर नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान