छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : मराठी भाषा अभिजातच नव्हे तर बहुजात आणि बहुज्ञात झाली पाहिजे. साहित्यकलेसाठी सरकारकडून होत असलेली मदत उपकार नव्हेत. साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी. मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक सर्व साह्य सरकार करेल, असे आश्वासन राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलन समारोपप्रसंगी ते बोलत होते.

दिल्लीमध्ये संमेलनाच्या महाकुंभामध्ये सर्वप्रवाहांचा संगम झाला आहे. इथे साहित्यस्नान घेऊन आपण सगळे पवित्र झालो आहे. इथून आपण मराठी भाषेच्या संवर्धनाचा वसा बरोबर घेऊन जाणार आहोत. अजित पवारांकडे अर्थखाते असून मराठी भाषेच्या विकासासाठी ते योग्य तरतूद करतील. कशासाठी पैसे द्यायचे हे अजित पवारांना कळते, असेही शिंदे म्हणाले. साहित्यिकांनी मराठी भाषेला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध योजना आखली पाहिजे. त्यांनी तपशीलवार सूचना सरकारकडे केल्या पाहिजेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. सरकार कुठेही कमी पडणार नाही. अजित पवारांकडे सरकारच्या तिजोरीची चावी असल्याने निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. तर दिल्लीतील मराठी लोकांना एकत्र येण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हक्काचे ठिकाण असले पाहिजे. त्यासाठी जागा शोधून नवी वास्तू उभारली जाईल. १० मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. आज जगभरात अस्मितेची लढाई सुरू आहे, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी मोहीम चालवावी लागते. ब्रिटनचे माजी पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते, इग्लंड देऊ पण, शेक्सपिअर देणार नाही. आता मराठी संस्कृती टिकवण्याचा टोकाचा आग्रह धरलाच पाहिजे, असे शिंदे म्हणाले. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले चाकावरचे साहित्य संमेलन हा अनोखा उपक्रम असून इथूनपुढे प्रत्येक साहित्य संमेलनात अशा यात्री संमेलनाचे आयोजन केले जावेत. सरकारकडून मदत केली जाईल, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले.

पंतप्रधानांचे आभार

शिंदे व पवार यांनी आपल्या भाषणांत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. उद्घाटन सोहळ्यामध्ये संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्या भाषणाने पंतप्रधान प्रभावित झाले. भाषण संपल्यावर ते भवाळकरांना ‘खूपच छान’ असेही म्हणाले. त्यावर भवाळकरांनीही ‘मने बी गुजराती आवडी छे’ म्हणाल्याचे सांगत भाषा मने जोडून गेली व वाद-नाराजीनाट्य झाले नाही, असे पवार म्हणाले. तर आपण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे शिंदे म्हणाले.

अजितदादांचेही ‘ठराव’

●मराठी पुस्तकांचा खप कमी झालेला आहे. मराठी वाचवायची असेल तर मराठीतील पुस्तकांची विक्री वाढली पाहिजे आणि ही जबाबदारी साहित्यिकांचीच आहे.

●कवी-लेखकांनी दुसऱ्याची किमान पाच पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. तरच त्यांना साहित्यिक मानले जाईल, असा ठराव करावा असा गमतीदार सल्ला अजित पवार यांनी दिला.

●तसेच प्रतिथयश साहित्यिकांनी जिल्हास्तरीय संमेलनांना जाऊन तालुका-गावपातळीवरील संमेलने नव्या लेखक-कवींसाठी सोडण्याचाही थराव करावा, असे ते मिश्किलपणे म्हणाले.

विज्ञान भवनामध्ये झालेल्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये मोदी व शरद पवार यांच्यातील आपुलकी दिसली. एकमेकांबद्दलचा आदर दिसला. हाच महाराष्ट्रधर्म आहे. निवडणुकीनंतर आपण सगळेच मतभेद विसरतो. राजकारणापलिकडे नाते असते. हेच मराठी भाषेचे देणे आहे. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Story img Loader