पीटीआय, टोक्यो/ओटावा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासह जगभरातील नेत्यांनी ओदिशामधील रेल्वे अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी या अपघातातील मृतांबद्दल आपले शोकसंदेश भारत सरकारला पाठवले आहेत.

रशियाचे अध्यक्षीय कार्यालय ‘क्रेमलिन’च्या संकेतस्थळावर प्रकाशित ‘टेलीग्राम’ संदेशात पुतिन यांनी नमूद केले आहे, की ओदिशातील दु:खद रेल्वे अपघाताबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी बचावकार्यात अथक मदत करणाऱ्यांची प्रशंसा केली. सुनक यांनी ‘ट्वीट’ केले, की माझ्या सहसंवेदना पंतप्रधान मोदींसह ओदिशातील दु:खद घटनेची झळ पोहोचलेल्या सर्वासोबत आहेत.

रेल्वे अपघातानंतर जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी पंतप्रधान मोदींना शोकसंदेश पाठवला आहे. त्यांनी म्हटले आहे, की, ओदिशातील रेल्वे अपघातात अनेकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले. जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांनीही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना शोकसंदेश पाठवला आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो म्हणाले की, कॅनडावासीय या कठीण काळात भारतीयांच्या पाठीशी उभे आहेत. ओदिशातील रेल्वे अपघाताची छायाचित्रे आणि बातम्या पाहून मी व्यथित झालो.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी ‘ट्वीट’ केले, की ओदिशातील रेल्वे अपघाताचे दु:खद वृत्त समजले. मी अपघातग्रस्त भारतीयांसाठी प्रार्थना करतो. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री एटोनियो ताजानी यांनीही इटली सरकारच्या वतीने या अपघाताबद्दल शोक व्यक्त करून जखमींसाठी प्रार्थना केली. तैवानच्या अध्यक्ष साई इंग वेन यांनीही शोकसंवेदना व्यक्त केला.

सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी ‘ट्वीट’ केले, की ओदिशातील रेल्वे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अतीव दु:ख झाले आहे. मी पंतप्रधान मोदी, सरकारकडे सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच शोकाकुल कुटुंबांच्या दु:खात मीही सहभागी आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सांगितले की, या अपघाताबाबत कळल्यानंतर खूप दु:ख झाले.

संयुक्त राष्ट्रांकडून दु:ख

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी अपघातग्रस्त, त्यांचे कुटुंबीयांप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मला तीव्र दु:ख झाले. या अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे.
(वाराणसीतील गंगा घाटावर शनिवारी बालासोर रेल्वे अपघातातील मृतांना गंगा समितीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.)

Story img Loader