किराणा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना निश्चितपणे मिळेल आणि कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेत त्याद्वारे नवे तंत्रज्ञान विकसित होईल, असा ठाम दावा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी येथे केला. किराणा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला अनुमती देण्याच्या निर्णयास पंजाबमधील शेतकरी संघटनांचा व्यापक पाठिंबा होता, असेही ते म्हणाले.
थेट परकीय गुंतवणुकीस अनुमती मिळाल्यामुळे आता कृषी बाजारपेठेत नवीन तंत्रज्ञान विकसित होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. कृषी क्षेत्रात भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पंजाब कृषी विद्यापीठासारख्या अन्य विद्यापीठांनीही आता तयारीत राहिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पिकांसाठी जमिनीतून मोठय़ा प्रमाणावर करण्यात येणाऱ्या पाण्याच्या उपशाचा मुद्दा उपस्थित करून पुढील काळात हे आव्हान आपण कशा प्रकारे उचलू शकतो, याचा विचार पंजाब कृषी विद्यापीठाने करावा, अशी सूचना त्यांनी केली.
देशातील कृषी उत्पादनांच्या साखळ्या अत्यंत अपुऱ्या आणि अकार्यक्षम असल्यामुळे उत्पादक आणि ग्राहकांनाही त्याचा तोटा सहन करावा लागतो. ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागते तर ही वाढीव किंमत उत्पादकांपर्यंत पोहोचत नाही. या पाश्र्वभूमीवर कार्यक्षम आणि योग्य पुरवठय़ाच्या साखळ्या निर्माण झाल्यानंतर हे मुद्दे निकाली लागतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. कृषी संशोधनावर व्यापक भर देतानाच संपूर्ण देशाच्या दृष्टीने त्यास खूप महत्त्व आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. कृषी संशोधनावर ११ व्या योजनेत ०.६५ टक्के असलेली तरतूद आता १२ व्या योजनेत ती एक टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट असल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.
कृषी क्षेत्रासाठी जैवतंत्रज्ञानावरही पंतप्रधानांनी भर दिला. पुढील काळात हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.
किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा-पंतप्रधान
किराणा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना निश्चितपणे मिळेल आणि कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेत त्याद्वारे नवे तंत्रज्ञान विकसित होईल, असा ठाम दावा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी येथे केला. किराणा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला अनुमती देण्याच्या निर्णयास पंजाबमधील शेतकरी संघटनांचा व्यापक पाठिंबा होता, असेही ते म्हणाले.
First published on: 09-12-2012 at 02:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confident that fdi in retail will benefit farmers pm