भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संसदीय मंडळाच्या सदस्यांची निवड झाली असली तरी प्रदेश अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून गेल्या जानेवारी महिन्यापासून पक्षात निर्माण झालेला घोळ अद्याप कायम आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना कायम ठेवले जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच अचानक आमदार देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आल्याने विदर्भातील या दोन आमदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रदेश भाजपवरील वर्चस्व टिकविण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील वैयक्तिक संघर्षांने पुन्हा उग्र रूप धारण केल्याने प्रदेशाध्यक्षाची घोषणा लांबणीवर पडली आहे. आता गोपीनाथ मुंडे आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचीही नावे यात प्रकर्षांने घेतली जात असल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.
आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तोंड देऊ शकेल आणि आक्रमकपणे सामोरा जाईल, असा तरुण नेता निवडण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळाले होते. भाजपची शिवसेनेशी युती असली तरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीत सहभागी होण्याबद्दलची स्पष्ट भूमिका अद्याप ठरलेली नाही. त्यांनी ‘टाळी’ देण्यास तूर्त तरी नकार दिला असून राज्यव्यापी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. राज ठाकरेंच्या जाहीर सभांना होत असलेल्या प्रचंड गर्दीने काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपमध्येही अस्वस्थता आहे. दीड वर्षांवर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी भाजपची प्रचाराची दिशा अद्याप निश्चित झालेली नाही.
राज्यात गेल्या साडेआठ वर्षांपासून काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने भाजप-शिवसेना-रिपब्लिकन महायुतीला पुढील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविण्यासाठी प्रभावशाली नेतृत्वाची गरज आहे. भाजपच्या बहुतांश जिल्हा अध्यक्षांच्या निवडणुकांचा फार्स पूर्ण झाला असला तरी राज्य पातळीवरील नेतृत्व कोणाकडे जाते, यावरही बरीच समीकरणे अवलंबून राहणार असल्याने सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपच्या कोअर समितीची बैठक दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या नावांवर चर्चा झालेली नाही. आता राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात आल्याचे समजते. नितीन गडकरी जर पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते, तर नागपूरमधील एक ब्राह्मण नेता प्रदेशाध्यक्ष करण्यात पक्षाची अडचण होती. पण आता हा अडथळाही राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हे आक्रमक लोकप्रतिनिधी असून विविध विषयांचा त्यांचा अभ्यासही चांगला आहे. कोणत्याही वादात अडकलेले नाहीत किंवा त्यांनी पक्षातील कोणालाही दुखावलेलेही नाही, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे वैधानिक मार्गानी प्रकाशात आणून फडणवीस यांनी विरोधी पक्षाची भूमिका योग्य रीतीने वठविल्याचे पक्षातील अनेकांचे मत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरी-मुंडे गटाचे संतुलन अत्यंत कुशलतेने सांभाळलेले आहे, त्यामुळे त्यांच्या नावाला फारसा विरोध नाही.

Story img Loader