नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्दय़ावरील चर्चेदरम्यान गुरुवारी दिल्ली विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. भाजपच्या आमदारांनी चर्चेला कडाडून विरोध केला. अखेर भाजपच्या पाच आमदारांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढले गेले.

मणिपूरच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले होते. मणिपूरशी कोणाला काही देणेघेणे नाही, असे वादग्रस्त विधान भाजपचे आमदार मोहन सिंह बिष्ट यांनी केल्यामुळे सभागृहातील गोंधळात वाढ झाली. उत्तर प्रदेशमधील विधानसभेने देखील मणिपूरच्या मुद्दय़ावर चर्चा केल्याचे विधानसभेच्या उपाध्यक्ष राखी बिर्ला यांनी सांगितले. मात्र, भाजपच्या आमदारांनी चर्चेला विरोध केला. त्यामुळे बिष्ट यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना सुरक्षारक्षकांनी (मार्शल) सभागृहाच्या बाहेर काढले. या आमदारांनी, ‘भ्रष्टाचाराचे दुसरे नाव केजरीवाल’ अशा घोषणा देत विधानभवनाच्या आवारात आंदोलन केले.

सभागृहात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली. भाजपचे आमदार स्पष्टपणे सांगत आहेत की त्यांचा मणिपूरशी कोणताही संबंध नाही. हा संदेश पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला, साडेसहा हजार गुन्हे नोंदवले गेले, दीडशेहून अधिक लोक मारले गेले तरीही मोदींनी मौन बाळगले. अत्याचारग्रस्त महिलांसाठी मोदी पितासमान आहेत, मोदी त्यांचे रक्षण करू शकले नाहीत. युरोपच्या संसदेने मणिपूरवर चर्चा केली, अमेरिकेतील राजकीय नेत्यांनीही निषेध केला. देशाची बदनामी झाली, तरीही मोदी गप्प राहिले, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

Story img Loader