येत्या पाच मे रोजी होत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीला काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने युद्धाचेच रूप दिले असून उभय पक्षांतील एकमेकांविरुद्धचा प्रचार हा अधिक कडवट, दोषारोपपूर्ण, व्यक्तिगत हल्ले चढविणारा आणि तिखट होत आहे.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकच प्रचारसभा घेतली. पण त्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर असा तिखट हल्ला चढविला की स्थानिक काँग्रेसनेते संतापून गेले आहेत. त्यांनी गुजरातच्या विकासाबाबतच प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या दोन मे रोजी म्हणजे प्रचाराच्या समारोपाच्या वेळी मोदी कर्नाटकात अखेरच्या दोन प्रचारसभा घेतील आणि त्या सभांमुळे मतांचे वारे भापजच्या दिशेने वाहतील, असा दावा ज्येष्ठ भाजप नेत्यांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे या सभा मंगळुरू व बेळगाव येथे होणार आहेत. भाजपकडून अध्यक्ष राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांनीही सभा घेतल्या.
राहुल गांधी हे बुधवारी तीन सभा घेणार आहेत. या सभा मंडय़ा, हसन आणि बेळगाव येथे होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या गुलबर्गा आणि बंगळुरू येथे सभा घेणार आहेत. बाकी पक्षांना वलयांकित नेत्यांची चणचण भासत आहे.
काँग्रेसने भाजपविरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा परजला आहे. राज्यातील भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्ट असल्याचा प्रचार काँग्रेस करीत आहे तर टूजी, राष्ट्रकुल घोटाळ्यावरून केंद्रीतील सत्तारूढ आघाडीच कशी सर्वात भ्रष्ट आहे, याचा धडाकेबाज प्रचार भाजपकडून सुरू आहे.

Story img Loader