काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी रात्री रुग्णवाहिकेमधून न नेल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मारलेल्या शेऱ्याबद्दल काँग्रेसने त्यांच्यावर मंगळवारी टीका केली. लोकांच्या प्रकृतीचे नेत्यांनी राजकारण करू नये, असा सल्लाही मोदी यांना काँग्रेसने दिला आहे.
एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यानंतर त्या व्यक्तीस देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल कोणी कसे काय बोलू शकते, अशी विचारणा पक्षाचे प्रवक्ते भक्तचरण दास यांनी केली. कोणाही व्यक्तीची प्रकृती आणि तिला देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल सभ्य समाजातील नेत्यांनी काही शेरेबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मोदी यांच्या शेऱ्यांना आक्षेप घेत दास म्हणाले, संसदेत डॉक्टर आहेत, वैद्यकीय सुविधाही आहेत. मात्र सोनिया गांधी या अचानक बाहेर आल्या आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुद्दय़ांची चर्चा करण्याची काय गरज आहे, असे विचारून असे प्रश्न  विचारणे माणुसकीला धरून होणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले.
तत्पूवी, संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनीही मोदी यांच्या शेऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्व सुविधा तेथे उपलब्ध होत्या. खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जे काही योग्य वाटले, तेच त्यांनी केले, असे स्पष्ट सांगितले.