मागील महिन्यामध्ये बस्तरमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या कटाला वेगळे वळण मिळाले आहे. शनिवारी काँग्रेसच्या वतीने एक ‘एसएमएस’ प्रसिध्द करण्यात आला. त्या ‘एसएमएस’द्वारे काँग्रेसने छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्याकडे इशारा करून या हल्ल्याच्या कटामध्ये सामिल असल्याचा आरोप केला आहे.
छत्तीसगढ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल व त्यांचा मुलगा दिनेश पटेल या हत्याकांडात मारले गेले. दिनेश पटेल यांनी २३ मे रोजी छत्तीसगढ कॉंग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष शैलेश नितीन त्रिवेदी यांना एक एसएमएस पाठवला होता. “रमन सिंह को लेकर बडा खुलासा १५ जून को पीसीसीआय द्वारा…उसके बाद सीएम का इस्तिफा निश्चित,” असा मजकूर असलेला तो एसएमएस आहे. माओवाद्यांनी २५ मे रोजी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दिनेश पटेल यांची कोणतेही कारण नसताना हत्या करण्यात आली. गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश गुप्ता यांनी देखील दिनेश पटेल यांना माओवाद्यांनी ‘निवडून वेगळे केले’ व नंतर त्यांची हत्याकेली यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. माओवाद्यांनी प्रसिध्द केलेले वक्तव्य देखील दिनेश पटेल यांची थंड डोक्याने हत्या केलीगेली असे सूचित करते.
“दिनेश पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात काहीतरी महत्वाची माहिती होती, असे या एसएमएसमधून सूचित होत आहे. सुरूवातीपासून आम्ही सांगत आलो आहोत की, या हत्याकांडामागे मोठा कट आहे आणि या कटामध्ये भाजपचा हात आहे. एसएमएस तर सरळ मुख्यमंत्र्याकडेच इशारा करत आहे.”, असे काँग्रेसचे कार्यक्रम समन्वयक भूपेश बाघेल यांनी संडे एक्स्प्रेसला सांगितले.
 ” या हल्ल्यामध्ये केवळ दोन जणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. महेंद्र कर्मा आणि दिनेश पटेल यांना माओवाद्यांनी ज्या पध्दतीने मारले तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे. दिनेश यांच्या डोक्यावर अनेक जखमा आढळल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, माओवादी सारखे दिनेश पटेल कोण आहे? असे हल्ल्यादरम्यान विचारत होते. त्यानंतर माओवादी दिनेश पटेल यांचा लॅपटॉप शोधत होते…असे का? त्यांना दिनेश यांना का मारायचे होते? त्यांना दिनेशचा लॅपटॉप का हवा होता?” असे प्रश्न बाघेला यांनी उपस्थित केले आहेत.
रमन सिंह हे राज्यातील एकिकृत सुरक्षादलाचे प्रमुख आहेत, त्यांना या हल्ल्या विषयीची माहिती केव्हा मिळाली व त्यांनी सुरक्षा दलांना काय सुचना केल्या याचा खुलासा करावा अशी मागणी बाघेला यांनी केली आहे.
या हल्ल्या विषयीची गुप्त माहिती गहाळ करण्यात आली असून, तपास संस्थांनी ही माहिती तत्काळ प्रकाशात आणावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले असून, एसएमएस तपास संस्थांच्या हवाली करून तपासात मदत करण्याचे आवाहन केले आहे. “एसएमएस हे फक्त एक संवादाचे माध्यम आहे. ते काही वास्तववादी असू शकत नाही आणि पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. काँग्रेसने संकूचीत राजकारण न करता, हल्ल्याचा तपास योग्य दिशेने जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी तो एसएमएस तपास संस्थांच्या हवाली करावा,” असे भाजपचे प्रवक्ते संजय श्रीवास्तव म्हणाले.                 

Story img Loader