प्रियांका गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यात कमालीचे साम्य आहे. मात्र, प्रियांका इंदिरा गांधींप्रमाणेच कर्तृत्ववान आहेत का, हे वेळच सिद्ध करेल, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. प्रियांका यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, असे समस्त काँग्रेस परिवाराला वाटते. मात्र, याचा अंतिम निर्णय गांधी परिवारच घेईल, असे दिग्विजय यांनी म्हटले. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रियांका महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार का, या प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
गांधी परिवारातील नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा भाजपचा घाट – दिग्विजय सिंह 
काँग्रेस पक्षाचा विचार करायचा झाल्यास प्रियांका सक्रिय राजकारणात आल्यास सर्व कार्यकर्त्यांना आनंद वाटेल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका अमेठी आणि रायबरेली हे पारंपरिक मतदारसंघ वगळता प्रचार करणार का, हा निर्णय सर्वस्वी प्रियांका आणि गांधी परिवाराचा आहे.
यावेळी प्रियांका यांच्याकडे इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे क्षमता आहेत का, असा प्रश्न दिग्विजय सिंह यांना विचारण्यात आला. तेव्हा दिग्विजय सिंह म्हणाले की, इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात लक्षणीय साम्य आहे. परंतु, त्यांच्याकडे इंदिरा गांधी यांच्याइतकीच क्षमता आहे का, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. मात्र, प्रियांका यांच्याकडे निश्चितपणे लोकनेता होण्याची क्षमता असल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.

 

Story img Loader