आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तर-पूर्वेकडील राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस पक्षाने दिले आहेत. या क्षेत्रातील २५ जागांपैकी २० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठरविले असून त्यासाठी यूपीए सरकारने विकासाच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे उत्तर-पूर्वेकडील क्षेत्रात कोणतेही आव्हान नाही, असे स्पष्ट करून केंद्रीय मंत्री पवनसिंग घटोवार यांनी, आगामी निवडणुका उत्तर पूर्वेकडील क्षेत्रात काँग्रेससाठी आनंदाची बातमी देतील, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विविध पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेऊन रेल्वेचे जाळे पसरण्यासाठी वार्षिक ६०० कोटी रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर घटोवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. उत्तर-पूर्वेकडील राज्यांचा सर्वागीण विकास करण्यास काँग्रेस बांधील असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी या क्षेत्राच्या विकासावर प्रकाशझोत टाकला असून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पायाभूत विकासाबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. या क्षेत्राच्या विकासात सोनिया गांधी अधिक रस घेत असल्याचेही घटोवार म्हणाले.