झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांच्यात विस्तृत चर्चा झाल्याने झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
नवे आघाडी सरकार कोणत्या किमान समान कार्यक्रमांवर कारभार पाहील, याबाबत हेमंत सोरेन आणि हरिप्रसाद यांनी जवळपास अडीच तास चर्चा केली. या बैठकीत मंत्र्यांची नावे आणि त्यांना देण्यात येणारी खाती यासंदर्भात चर्चा झाल्याने शुक्रवारी किंवा गुरुवारी सायंकाळपर्यंत नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नव्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबाबतही सविस्तर चर्चा झाली असून, त्यामध्ये किंचित बदलही करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने पाठिंबा काढून घेतल्याने अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत सरकार कोसळले आणि १८ जानेवारीपासून या आदिवासीबहुल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीची मुदत १८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा उमेदवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास काँग्रेसने अनुकूलता दर्शविली आहे. त्या बदल्यात राज्यातील लोकसभेच्या एकूण १४ जागांपैकी नऊ जागा काँग्रेससाठी सोडण्यास झारखंड मुक्ती मोर्चाने अनुमती दिली आहे. नव्या सरकारला आपला पाठिंबा राहील, असे आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी जाहीर केले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे १८, काँग्रेसचे १३ आमदार असून सरकार स्थापनेसाठी ११ सदस्यांची गरज आहे. आरजेडीचे ५ आमदार असून भाकप-एमएल (एल), मार्क्‍सवादी समन्वय पार्टी, झारखंड पार्टी (इक्का), झारखंड जनाधिकार मंच आणि जयभारत समता पार्टी यांचा प्रत्येकी एक सदस्य असून काही अपक्ष सदस्यही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा