गेल्या वर्षभराच्या काळातील मोदी सरकारचा गतिमान कारभार पाहून कॉंग्रेस नेते अस्वस्थ झाले असून, ते सरकारचा कामाचा वेग रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी केला. कॉंग्रेसच्या २५ खासदारांना लोकसभेतून पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. राज्यसभेमध्येही कॉंग्रेसचे सदस्य सरकारविरोधात घोषणा देत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
ते म्हणाले, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे केंद्र सरकारचे बलस्थान आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे दोघेही उत्कृष्टपणे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सरकारला अजून मोठा टप्पा पार करायचा आहे. मात्र, विरोधकांनी अकारण केलेल्या कोणत्याही मागण्या आम्ही मान्य करणार नाही.
ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर व्यापमं घोटाळ्यावरून शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागण्यांमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक आहेत.
मोदी सरकारच्या गतिमान कारभारामुळे कॉंग्रेस नेते अस्वस्थ – व्यंकय्या नायडू
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे केंद्र सरकारचे बलस्थान आहे.
First published on: 05-08-2015 at 11:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cong rattled at govt success wants to block it says naidu