आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांमधील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचता येण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सात दिवसांची पदयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील लोकसभा मतदारसंघांत पदयात्रा काढण्याच्या राहुल गांधी यांच्या सूचनेला काँग्रेसच्या प्रचार समितीकडून मान्यता मिळाली असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघांच्या कक्षेत येणा-या २,००० पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांमध्ये तसेच ग्रामीण भागातील स्थानिक बाजारांमध्ये पक्षाचा प्रचार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवरील सभा, संमेलने आणि जनसभांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा विचार आहे. सात दिवसांच्या या पदयात्रेत दररोज १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करण्याचा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा मनसुबा आहे. या पदयात्रे दरम्यान काँग्रेसने केलेल्या विकासकामांचा आढावा घेणारी पत्रके वाटण्यात येणार आहेत. यासंदर्भात पक्षनेतृत्वाकडून संबधित राज्याचे सचिव, प्रदेश काँग्रेस प्रमुख यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Story img Loader