Congo rebel conflict Hundreds of women raped, burnt alive : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशातील गोमा शहरावर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रवांडाच्या पाठिंब्याने एम २३ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने कब्जा मिळवला. यावेळी गोमा शहरातील मुन्झेन्झे कारागृहातील हजारो महिलांवर बलात्कार केल्याचे तसेच त्यांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यावेळी काँगोमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे सांगितले जात आहे.
मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाच्या पूर्वेला असलेल्या गोमा शहर हे खनिजसंपन्न असून रवांडा या देशाची पाठबळ असलेल्या एम २३ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने यावर ताबा मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे, १९९६ -१९९७ आणि १९९८ ते २००३ या काळात झालेल्या युद्धात येथे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे तर लाखो लोक विस्थापित झाले आहेत
यून राईट ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार काँगोमध्ये झालेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा, विस्थापितांच्या छावण्यांवर बॉम्बहल्ले, याबरोबरच सामूहिक बलात्कार आणि इतर लैंगिक अत्याचारांचा देखील यामध्ये समावेश असल्याचे वृत्त आहे.
तुरूंग फोडीच्या घटनेदरम्यान गोमा येथील मुन्झेन्झे (Munzenze Prison) तुरूंगात शेकडो महिला कैद्यांवर हल्ला करण्यात आला. द गार्डियनने यूनच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. गोमा येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचे डेप्युटी हेड विवियन व्हॅन डी पेरे (Vivian van de Perre) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तुरूंगातून हजारो पुरुष कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले परंतु यावेळी तुरूंगात महिलांसाठी असलेल्या भागाला आग लावण्यात आली. २७ जानेवारी रोजी सकाळी एम२३ बंडखोर गोमामध्ये घुसल्यानंतर लगेचच काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये या तुरूंगातून धुराचे लोट निघताना दिसून आले.
एम२३ बंडखोरांनी लादलेल्या निर्बंधांमुळे या घटनेची अधिक चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांना या तुरूंगात जाता आले नाही. दरम्यान काँगोमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही, तरीही केल्या काही दिवसात झालेला हा सर्वात वाईट हिंसाचार असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार काँगोच्या गोमा शहरात मंगळवारी २००० मृतदेह तसेच पडून होते
“तुरूंगातून निसटून ४००० कैदी फरार झाले. शेकडो महिला देखील त्या तुरूंगात होत्या… त्या सर्वांवर बलात्कार करण्यात आले त्यानंतर महिलांच्या भागाला आग लावण्यात आली. त्यानंतर त्या सर्वांचा मृत्यू झाला”, असेही विवियन व्हॅन डी पेरे यांच्या हवाल्याने रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने गोमामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठकीचे आयोजित केल्याचे मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोने या बैठकीसाठी विनंती केली होती. ७ फेब्रुवारी रोजी जिनिव्हा येथे ही बैठक होईल.