मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या खळबळजक विधानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओवरून आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय, राष्ट्रवादीकडून मलिक यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकारामुळे शेकडो शेतकऱ्यांचे प्राण गेले. अखेर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींची कानउघाडणी केलीच. सत्यपाल मलिक यांनी पक्षीय अभिनिवेश वगळून, तटस्थ, थेट आणि लोकशाहीची बुज राखणारी भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. ” असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलेलं आहे.
याचबरोबर काँग्रेसने देखील या खळबळजनक व्हिडिओच्या आधारावरून मोदींवर निशाणा साधला आहे. “अहंकार, क्रूरता आणि असंवेदनशीलता…असा उल्लेख करत काँग्रेसकडून म्हटले गेले आहे की, भाजपाच्या राज्यपालांच्या या विधानामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यातील गुणांचे वर्णन आहे. पण लोकशाहीसाठी ही चिंताजनक बाब आहे.”
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकार आणि भाजपा नेतृत्वावर आपली आक्रमक भूमिका कायम ठेवलेली आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना, त्यांनी आरोप केला की, मी जेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, तेव्हा पाच मिनिटांमध्ये आमच्यात वाद झाला. ते खूप अहंकारात होते.
हरियाणातील दादरी येथे एका सामाजिक कार्यक्रमाला संबोधित करताना सत्यपाल मलिक यांनी याबाबत खुलासा केला आहे. “जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांना खूप गर्व होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, आपले ५०० लोक मेले आहेत, यावर त्यांनी माझ्यासाठी मेले आहेत का?, असा प्रतिप्रश्न मला विचारला. मी म्हणालो की, हो तुमच्यासाठीच मेलेत कारण तुम्ही राजे झाला आहात ना. यावरून माझे त्यांच्याशी भांडण झाले,” असे मलिक म्हणाले. पंतप्रधान म्हणाले आता तुम्ही अमित शहांना भेटा. त्यानंतर मी अमित शहा यांची भेट घेतली, असे मलिक यांनी पुढे सांगितले आहे.
ते ५०० शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; मोदींनी संतापून प्रतिप्रश्न विचारल्याचा राज्यपालांचा दावा
याआधीही सत्यपाल मलिक यांनी अनेकवेळा कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, अखेरीस केंद्राला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. तसेच सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचा परिणाम थेट भारतीय सैन्य दलावर होत असल्याचा गंभीर इशारा दिला होता.