भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असून भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी त्यात भर घातली. पंतप्रधानपदासाठी मोदी यांच्या नावाची आम्ही घोषणा केल्यापासून काँग्रेस सैरभैर झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
नायडू म्हणाले की, मोदी यांच्या नावाची घोषणा केल्यापासून आमचे सर्व विरोधक व विशेषत: काँग्रेसची मंडळी सैरभैर झाली आहेत. मोदी यांना देशभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळत असल्याचे पाहून त्रस्त झालेले काँग्रेसचे नेते बेजबाबदार व मूर्खपणाची विधाने करीत सुटले आहेत. ज्यांनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला तीच मंडळी आता मोदींवर लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करीत आहेत. मोदी आणि त्यांच्या विकासाच्या अजेंडय़ाला आपण समर्थपणे तोंड देऊ शकणार नाही, याची जाणीव असल्यानेच काँग्रेसचे नेते हवालदिल झाले आहेत.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे येतील, मात्र आम्ही ही निवडणूक प्रामुख्याने विकासाच्या मुद्दय़ावरच लढविणार असल्याचे नायडू यांनी सांगितले.

अडवाणी विरोध करणार नाहीत
अडवाणी यांच्या रुसव्याबाबत विचारले असता नायडू यांनी थेट मतप्रदर्शन करणे टाळले. अडवाणी हे आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, आम्हा सर्वाना त्यांनीच घडवले आहे. त्यांच्या नाराजीबाबत मी बोलणे योग्य ठरणार नाही, मात्र ते मोदी यांना विरोध करणार नाहीत, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, असे ते म्हणाले. पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांनंतर मोदी यांच्या नावाची घोषणा करावी, असे त्यांचे मत होते तर संसदीय मंडळातील अनेकांना या घोषणेसाठी ही वेळ योग्य वाटली, असे नायडू यांनी सांगितले. संसदीय मंडळातील बहुतांश सदस्यांचा मोदींबाबतच्या घोषणेला पाठिंबा होता, असे सूचक विधान त्यांनी केले.

Story img Loader