देशभर आंदोलनाचा इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्यालयात प्रवेश करून पोलिसांनी पक्ष कथितरीत्या ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर, काँग्रेस बुधवारी भाजपाविरोधात आक्रमक झाल्याचे दिसले. ‘दिल्ली पोलीस दल हे भाजपाचे खासगी माफिया झाला आहे.. केंद्र सरकार हुकूमशाही प्रवृत्तीचे असून एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जात आहे,’ अशी आरोपांची सरबत्ती काँग्रेसने केली आणि केंद्र सरकारने राजकीय पक्षाच्या गळचेपीविरोधात देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

नॅशनल हेराल्डशी निगडित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी, सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची चौकशी केली. ही चौकशी सुरू राहिल्याने बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलनही कायम होते. त्यामुळे काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या अकबर रोड परिसरात पोलिसांनी जमाव बंदी लागू केली होती. निमलष्करी दलाचे जवान आणि दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयाला चहूबाजूने घेराव घातलेला होता. तरीही शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सकाळपासून काँग्रेसच्या मुख्यालयासमोर जमले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी केल्यानंतर काही कार्यकर्ते मुख्यालयात प्रवेशद्वारातून आले गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलीस काँग्रेसच्या मुख्यालयात घुसले व लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन यांच्यासमोर कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेऊन फरपटत बाहेर आणले. काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांनी प्रवेश करू कार्यकर्त्यांची केलेली धरपकड नेत्यांसाठी धक्कादायक होती. या प्रसंगाची चित्रफीत काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी समाजमाध्यामांवरून लोकांपर्यंत पोहोचवली. या घटनेनंतर, काँग्रेसच्या नेत्यांना संताप अनावर झाला. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मल्लिकार्जुन खरगे, रणदीप सुरजेवाला आदींनी तातडीने बैठक घेऊन केंद्र सरकार व भाजपाला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला.

देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय

काँग्रेस मुख्यालयामध्ये पोलिसांच्या घसुखोरीच्या निषेधार्थ काँग्रेसने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यालयात घुसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. शिवाय, राज्या-राज्यातील राजभवनाला गुरुवारी काँग्रेस कार्यकर्ते घेराव घालतील. शुक्रवारी देशभर सर्व जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली जातील, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

आंदोलन आणि धरपकड सुरूच

काँग्रेसच्या अनेक खासदारांनी, नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी धरणे आंदोलन केले. आम्ही दहशतवादी आहोत का? भाजपा आम्हाला का घाबरत आहे? केंद्र सरकार काँग्रेसची नाकाबंदी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली. राहुल गांधी यांची ईडीकडून होत असलेली चौकशी म्हणजे भाजपाचा राजकीय सूड असल्याची टीका काँग्रेसने केली असून खासदारांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीविरोधात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे हक्कभंग नोटिशीसाठी पत्र पाठवणार असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.

‘अहंकाराची किंमत चुकवावी लागेल!’

काँग्रेसच्या ट्वीटर खात्यावरून पोलिसांच्या मुख्यालयातील ‘घुसखोरी’चा निषेध करण्यात आला. (भाजपा) हुकुमशहा.. गुंडगिरीच करायची असेल तर, लोकशाहीची खुर्ची करा आणि लोकांना सामोरे जा, ज्या काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांच्या वेशात गुंड पाठवले, त्या कार्यालयाने जगातील सर्वात प्रबळ साम्राज्याचा पराभव केला आहे. तुझ्या अहंकाराची किंमत आहेच किती? तुझा हा अहंकार आम्ही मोडून काढू, असे काँग्रेसने एकेरीत ट्वीट करून भाजपावर  शाब्दिक हल्लाबोल केला. केंद्र सरकार आणि भाजपा देशातील लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप के. सी. वेणुगोपाल यांनी केला.

तिसऱ्या दिवशीही राहुल गांधींची चौकशी

तिसऱ्या दिवशी, बुधवारीही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेसच्या मुख्यालयातून सक्तवसुली संचालनालयाच्या मुख्यालयात गेले. दुपारी साडेतीनपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. भोजन मध्यंतरानंतरही राहुल गांधी यांच्या चौकशीचे सत्र सुरू राहिले. परिवर्तन भवनातील ईडीच्या कार्यालयापर्यंत प्रियंका गांधी-वाड्राही राहुल यांच्यासोबत होत्या. राहुल गांधी यांची दोन दिवसांमध्ये २५ तास चौकशी करण्यात आली असून पैशाच्या अफरातफरीच्या कथित प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

भाजपाविरोधात आज राजभवनाला घेराव 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात राज्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारने सुरू केलेल्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी राजभवनाला घेराव घालण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांनी केली. ब्रिटिश सत्तेला भारतातून हद्दपार करणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या दडपशाहीला भीक घालणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या राजभवनावर मोर्चा काढून घेराव घातला जाणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयी आंदोलन करण्यात येणार आहे, असे काँग्रेस नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, आदी नेते उपस्थित होते. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्टय़ा संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपाने काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे. पण ब्रिटीश सत्तेला नामोहरम करून पळवून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपाची उलटी गणती सुरू झाल्याचे द्योतक असल्याचे पटोले म्हणाले.

 रस्त्यावर आंदोलन

पत्रकार परिषदेनंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी रिगल सिनेमाजवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करून मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

‘न्यायालयीन चौकशी करा!’  

राज्याचे सार्वजिनक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की,  देशात सध्या आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घूसून काँग्रेस नेते व पत्रकारांना मारहाण केली, कलम १४४ लावले आहे. कोणत्याही कार्यालयात कलम १४४ कसे काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने याची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.