नवी दिल्ली: ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वावरून घटक पक्षांनी काँग्रेसविरोधात उघडपणे भूमिका घेतली असली तरी, हा दबाव पूर्णपणे झुगारून काँग्रेसने मोदी-अदानींच्या कथित हितसंबंधांवर हल्लाबोल मंगळवारीही चालू ठेवला. दरम्यान, इंडिया आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे द्यावे, असा सूर काही घटक पक्षांनी आळवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी-अदानीविरोधातील काँग्रेसचे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. मंगळवारीही काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात अदानी समूहाच्या कथित लाचखोरीच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. काँग्रेसचे दोन्ही सभागृहांतील सदस्य मंगळवारी ‘मोदी-अदानी भाई-भाई’चा नारा देणाऱ्या पिशव्या घेऊन आले होते. गेले काही दिवस काँग्रेसचे खासदार सातत्याने अदानीचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

हेही वाचा : Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप

मोदी व अदानींना लक्ष्य करणाऱ्या रणनीतीचा काँग्रेसने अवलंब करू नये, अशी भूमिका ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी घेतली असली तरी काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. काँग्रेसच्या संसदेच्या आवारातील निदर्शनांमध्ये मंगळवारी देखील तृणमूल (पान ५ वर) (पान १ वरून) काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार सहभागी झाले नव्हते. यातून ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेसमध्ये मतभेद तीव्र होऊ लागले असले तरी अदानीच्या मुद्द्यावरून संसदेच्या आवारात व संसदेतही आंदोलन चालूच राहील, असा संदेश मंगळवारी काँग्रेसने घटक पक्षांना दिला.

‘इंडिया’चे नेतृत्व कोणाकडे?

इंडिया आघाडीचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याच्या मागणीला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी पाठिंबा दिला. त्यामुळे ‘इंडिया’तील नेतृत्वावरून मतभेद वाढू लागल्याचे मानले जात आहे. काँग्रेस इंडिया आघाडीला विश्वासात न घेता स्वत:चे धोरण राबवत असून त्यामध्ये घटक पक्षांना सहभागी होण्यास भाग पाडत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याच्या मागणीला समाजवादी पक्ष, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आदींनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, या मागणीवर काँग्रेसच्या एकाही नेत्याने जाहीरपणे मत व्यक्त केलेले नाही. ‘इंडिया’चे नेतृत्व तृणमूल काँग्रेस वा अन्य पक्षाकडे देण्याबाबत केवळ चर्चा होत असून वास्तविक असा कोणताही बदल होण्याची शक्यता नाही, असे मत इंडिया आघाडीतील नेत्याने व्यक्त केले.

हेही वाचा :Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?

निदर्शनांवर लोकसभाध्यक्षांची नाराजी

संसदेच्या आवारात काँग्रेसच्या खासदारांची निदर्शने सुरू राहिल्याने मंगळवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. विरोधकांची निदर्शने अशोभनीय आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ सदस्यांचा यातील सहभागही उचित नाही, अशी टिप्पणी बिर्ला यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress agitation in parliament modi adani issue india alliance demand leadership given to mamata banerjee css