वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरातमधील ख्वाडा या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावामध्ये अदानी समूहाचा अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, अदानींच्या व्यवसायासाठी सरकारने सीमा सुरक्षेचे नियम बदलल्याचा आरोप करत एका व्यक्तीचे व्यावसायिक हितसंबंध देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठे आहेत का असा प्रश्न काँग्रेसने बुधवारी केला.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी ‘एक्स’वर ‘द गार्डियन’ या ब्रिटनमधील प्रतिष्ठित वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेले वृत्त सामायिक करत सरकारवर टीका केली. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘देशाची सर्व साधनसंपत्ती मित्रांना सोपवण्याचा प्रकार सीमा सुरक्षेचे नियम बदलण्यापर्यंत पोहोचला आहे का? या वृत्तानुसार, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली चिंता ऐकून न घेता अदानींच्या ऊर्जा पार्कासाठी सीमा सुरक्षा नियम बदलण्यात आले. एका व्यक्तीचे व्यावयाकित हितसंबंध देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठे आहेत का?’’
यामुळे भाजप सरकारचा छद्मा-राष्ट्रवादाचा चेहरा उघड झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. मोदी सरकारने केवळ पाकिस्तानच नव्हे तर बांगलादेश, चीन, म्यानमार व नेपाळच्या सीमेवरील जमिनींसाठीचे नियमही शिथिल केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही यावर टीका केली.
‘द गार्डियन’च्या वृत्तामध्ये खासगी संभाषण आणि गोपनीय दस्तऐवजांचा हवाला देत असे म्हटले आहे की, या प्रकल्पासाठी भारत-पाकिस्तान सीमेवरील संवेदनशील भागाला व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सुरक्षा नियमांमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी सीमेवरील आधीपासून असलेल्या गावांच्या पलिकडे आणि सीमेपासून १० किलोमीटर पर्यंत कोणतेही महत्त्वाचे बांधकाम करायला परवानगी नव्हती. मात्र गुजरात सरकारने कच्छच्या रणातील काही जमीन अदानी समूहाच्या सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पाला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती केली. त्यावर अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, मे २०२३मध्ये केंद्र सरकारने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
त्या ठिकाणी सुरूंग, रणगाडाविरोधी आणि शत्रूच्या जवानांविरोधात यंत्रणा उभारण्याची गरज पडली तर काय करणार? एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने हा प्रश्न विचारला आहे. आम्हीही हा प्रश्न विचारतो. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस