वृत्तसंस्था, जयपूर
राजस्थानमध्ये शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यामध्ये करणपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंह यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसने केला.करणपूर येथे काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांच्या निधनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, तिथे आता ५ जानेवारीला मतदान होत आहे. तेथील उमेदवाराला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा काँग्रेस निवडणूक आयोगाकडे उपस्थित करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोिवद सिंह दोतसारा यांनी सांगितले.सुरेंद्र पाल सिंह यांच्याशिवाय भाजपच्या २१ आमदारांनी शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यामध्ये किरोडीलाल मीणा, राज्यवर्धन राठोड यांचाही समावेश आहे. जयपूर येथे राजभवनात झालेल्या सोहळय़ामध्ये राज्यपाल कलराज मिश्रा यांनी एकूण २२ जणांना मंत्रिपदाची शपथ दिली.त्यापैकी १२ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, पाच जणांनी स्वतंत्र कारभारासह राज्यमंत्रीपदाची तर पाच जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी मागितली. मंत्रिमंडळात समाजाच्या सर्व स्तरांना प्रतिनिधित्व मिळाले असून ते राजस्थानच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करतील असा विश्वास राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केला. भजनलाल शर्मा यांनी १५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.