काँग्रेसच्या अमेठीतील कार्यालयावर काही अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. तसेच कार्यालयाबाहेर असलेल्या गाड्यांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. काँग्रेसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.
महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा या आजपासून अमेठी आणि रायबेरीलीच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या काही तासांपूर्वी हा हल्ला झाल्याने आता राजकीय वर्तुळातही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा – काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर; वरिष्ठांच्या भेटीनंतर घेतला ‘हा’ निर्णय
भाजपाच्या लोकांनी हल्ला केल्याचा काँग्रेसचा आरोप :
दरम्यान, हा हल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “अमेठीमध्ये स्मृती इराणी आणि भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच घाबरले आहेत. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे. हताश असलेले भाजपाचे गुंड लाठ्या घेऊन अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोहोचले आणि तिथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
“पोलिसांनीही बघायची भूमिका घेतली” :
पुढे बोलताना काँग्रेसने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा हल्ला होत असताना पोलिसांनी कारवाई न करता केवळ बघायची भूमिका घेतली, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. “या हल्ल्यादरम्यान अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत स्थानिक लोकांच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. मात्र या संपूर्ण घटनेदरम्यान पोलिसांनी कारवाई करता केवळ बघायची भूमिका घेतली”, असे काँग्रेसने म्हटलं आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये मुस्लीम फक्त मतदानासाठी; उमेदवारी कुणालाच नाही, का झालं असं?
२० मे रोजी अमेठीत मतदान :
दरम्यान, शुक्रवारी काँग्रेसकडून अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसने अमेठीतून राहुल गांधींऐवजी किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राहुल गांधी हे रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे ही नावे घोषित होण्यापूर्वी रायबरेलीतून प्रियंका गांधी वाड्रा या निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा केल्याने या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे.