विधानसभा निवडणुकींमध्ये विजयी होण्यासाठी काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबले आहे. या पक्षांची दहशतवाद्यांना सहानुभूती असून, निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत गलिच्छ राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला.
‘काँग्रेस हा अत्यंत ढोंगी पक्ष आहे. सुरुवातीस नक्षलवाद आणि दहशतवादी यांच्याबद्दल या पक्षाने अत्यंत सौम्य भूमिका घेतली होती. आता तर त्यांच्याबद्दल सहानुभूतीचेच धोरण अवलंबिले आहे,’ असा आक्षेप भाजपने घेतला. अफझल गुरूचे प्रकरण असो किंवा बाटला हाऊस चकमक, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोघांचेही प्रतिनिधी त्यांना भेटायला जातात, हे लांगूलचालन नाही तर दुसरे काय, असा संतप्त सवाल भाजपने केला.
 नितीन गडकरी यांनी आरोप करताना आपल्या मुद्दय़ांच्या समर्थनार्थ निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला पाठविलेल्या नोटिशीचा दाखला दिला. स्वत: घाबरणे आणि इतरांना घाबरवणे हाच काँग्रेसच्या सध्याच्या राजकारणाचा पाया असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. जिथे अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच जिथे केजरीवालांवर अविश्वास दाखवला तिथे इतरांचा प्रश्नच उद्भवत नाही, असा टोमणाही गडकरींनी केजरीवालांना मारला.