केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीची एम्समध्ये जाऊन चौकशी केली. मात्र, यावेळी मांडविया यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवायच रुग्णालयाच्या वार्डमध्ये फोटो काढल्यानं काँग्रेससह सिंग यांच्या मुलीनं त्यांना चांगलंच सुनावलंय. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला याबाबत ट्विट करत भाजपासाठी प्रत्येक गोष्ट फोटोसाठीची संधी असल्याचा आरोप केला. तसेच मांडविया यांचं हे कृत्य एक घाणेरडा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका केलीय.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, “भाजपासाठी प्रत्येक गोष्ट फोटोसाठीची संधी आहे. आरोग्य मंत्र्यांनी एम्समध्ये मनमोहन सिंग यांना भेटताना घाणेरडा प्रसिद्धीसाठीचा स्टंट केलाय. त्यांचा निषेध. त्यांची ही कृती नैतिकतेला नकार देणारी, माजी पंतप्रधानांच्या खासगीपणाचा भंग, प्रस्थापित परंपरांचा अपमान आहे. यात मुलभूत सभ्येतेचा अभाव आहे. त्यांनी तात्काळ माफी मागावी.”

“माझे आई-वडील ज्येष्ठ नागरिक आहेत, प्राणीसंग्रहालयातील प्राणी नाही”

दरम्यान, याआधी मनमोहन सिंग यांच्या मुलीनं आरोग्यमंत्र्यांच्या फोटोग्राफीवर आक्षेप नोंदवलाय. दमन सिंग म्हणाल्या, “आरोग्यमंत्र्यांनी एम्समध्ये भेट दिली आणि काळजी व्यक्त केली त्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं. मात्र, या परिस्थितीत माझे आई-वडील फोटो काढण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे माझ्या आईने फोटोग्राफरला एम्समधील रुममधून बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. माझे पालक एका अवघड परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. ते ज्येष्ठ नागरिक आहेत, प्राणीसंग्रहालयातील प्राणी नाहीत.”

“माझ्या वडिलांवर डेंग्यूचे उपचार सुरू आहेत आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालीय. त्यांना संसर्गाचा धोका असल्यानं आम्ही भेट देणाऱ्यांवर निर्बंध ठेवलेत,” असंही मनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांनी नमूद केलं.

हेही वाचा : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल!

दरम्यान, मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती एम्स प्रशासनानेने दिलीय.

Story img Loader