भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे आता विरोधकांकडून मागितले जात आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत? ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधानं त्यांच्याकडून का केली जात आहेत? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसंच, भारत आता त्यांच्या वीरांच्या बलिदानावर गप्प बसत नाही उलट ‘चुन चुन के बदला लेता है’ असंही मोदी म्हणाले.

यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी, ‘हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकबाबत शंका नाहीयेत पण अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याचे पुरावे जगासमोर सादर केले होते. त्याचप्रमाणे भारतानेही एअर स्ट्राइकचे भक्कम पुरावे सादर करावेत, कारण हे तंत्रज्ञानाचं युग आहे, उपग्रहाद्वारे छायाचित्र घेता येऊ शकतात’ असं म्हटलं होतं. त्यावरुन आज पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

बिहारच्या पाटणा येथे आज एनडीएकडून संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मोदी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी, ‘चौकीदार चोर नही चौकन्ना है, देशाला लुटणारे चौकीदारामुळे हैराण आहेत’ असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही पलटवार केला. गरीबांच्या हक्काचं हिसकावून स्वतःचं दुकान चालवणारे चौकीदारामुळे हैराण आहेत, त्यामुळे चौकीदाराला शिव्या दिल्या जात आहेत. पण तुम्ही निश्चींत रहा कारण चौकीदार चोर नही चौकन्ना है असं मोदी म्हणाले.

‘सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत; पण केवळ ‘देशाचा चौकीदार’ चोर आहे,’ ‘हवाई दल देशाचे रक्षण करते; मात्र मोदी यांनी तीस हजार कोटी रुपये चोरून ते अंबानींना दिले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेसच्या रॅलीमध्ये केली होती.

Story img Loader