काँग्रेस पक्ष फुटीरवाद्यांना पाठिंबा देऊन पंजाबमध्ये तणाव निर्माण करत असल्याचा आरोप शनिवारी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी केला. काही दिवसांपूर्वी अमृतसर येथे झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे काही नेते फुटीरतावाद्यांबरोबर व्यासपीठावर एकत्र दिसून आले होते. या कार्यक्रमात स्वतंत्र खलिस्तानची मागणीही करण्यात आल्याचे बादल यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. बादल यांनी शनिवारी दिल्लीत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली. राहुल गांधीच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस पंजाबमध्ये पुन्हा एकदा ऐंशीच्या दशकातील दहशतवादी वातावरण निर्माण करू पाहत आहे. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या गटांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून काँग्रेसने स्वत:चे देशविरोधी रंग दाखवून दिल्याची टीका यावेळी सुखबीर सिंह बादल यांनी केली.