आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दमदार विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्याचा सेलिब्रेटींसोबतच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आनंद लुटला. सामना जिंकल्यानंतर जगभरातील भारतीयांनी एकच जल्लोष केला. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना जिंकल्यानंतर त्यांनी सहकाऱ्याने दिलेला भारताचा झेंडा हातात पकडण्यास नकार देतानाची दृष्य कॅमेरात कैद झाली आहेत. या कृतीवरून काँग्रेसने जय शाह यांना लक्ष्य केलं आहे. “तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय आहे” असा टोला ट्विटरवरून काँग्रेसने लगावला आहे.
या मुद्द्यावरुन तेलंगणा राष्ट्र समितीनेही ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. “हे कृत्य बिगर भाजपा नेत्याने केलं असतं, तर काय झालं असतं? भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं” अशा आशयाचं ट्वीट टीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णन यांनी केलं आहे. भारत-पाक सामन्यादरम्यान जय शाह यांच्या कृतीवरुन आता विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
विश्लेषण : भारताचा पाकिस्तानवर विजय : सामन्याला कलाटणी देणारे पाच क्षण कोणते?
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानने ठोकलेल्या १४८ धावांचा यशस्वी पाठलाग करत भारताने पाकवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. सुरवातीला अडखळती सुरवात झाल्यानंतर रवींद्र जडेजाने २९ चेंडूत ३५ धावा धोकत धावफलक सांभाळला. रोहित शर्मा, विराट कोहली लगोलग बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीने भारताला विजय सुकर केला.