Congress-BJP MPs scuffle in Parliament : संसदेच्या परिसरात गुरूवारी (१९ डिसेंबर) झालेल्या धक्का बुक्कीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे.आता कोणत्याही राजकीय पक्ष किंवा खासदारांच्या गटला संसद भवनाच्या गेटवर कसल्याही प्रकरचे धरणे किंवा आंदोलन करता येणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने हे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या निर्देशांनंतर संसद भवनाच्या कोणत्याही गेटवर आंदोलन करता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने हे निर्देश जारी करताना संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

संसद भवनाच्या परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून आंदोलन केले जात असताना, गुरूवारी विरोध पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदार आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपाने आरोप केला की त्यांचे दोन खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना विरोधी पक्षांच्या खासदारांनी ढकलून दिल्याने ते जखमी झाले आहेत. भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी दावा केला की राहुल गांधी यांनी एका खासदराला ढकलले ज्यामुळे ते खाली पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही खासदारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही खासदारांना आरएमएल रुग्णालयात नेण्यात आले होते. तर राजपूत यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

संसदेबाहेर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधी आणि इतरांविरोधात दिल्ली पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये ११५, ११७, १२५, १३१, ३५१ आणि ३(५) या कलमांचा समावेश आहे.

हेही वाचा>> Parliament Scuffle : राहुल गांधींना दिलासा! हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा घेतला मागे, ‘हे’ गुन्हे कायम!

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

भाजपाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. पण त्यांनी आम्हाला मगर द्वार गेटवर रोखले. त्यांची मसल पॉवर दाखवण्यासाठी त्यांनी ते अनेक पुरुष खासदार घेऊन आले होते. आमच्याबरोबर महिला खासदार होत्या, त्यांनाही थांबवण्यात आलं होतं”. भाजपा खासदारांनी काँग्रेस नेत्यांना ढकलल्याचा आरोपही त्यांनी केला. खरगे म्हणाले की, “मी कोणालाही धक्का देण्याच्या स्थितीत नाही. मला माझा तोल सांभाळता आला नाही आणि मी खाली बसलो. आता ते आरोप करत आहेत की आम्ही त्यांना धक्का दिला”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bjp mps scuffle lok sabha speaker issues strict ban on demonstrations at parliament house gates rak