इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी दोषींना शिक्षा मिळालीच पाहिजे, असे विधान करून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालणार नसल्याचे आज स्पष्ट संकेत दिले. दुसरीकडे इशरतप्रकरणी केंद्र सरकार सीबीआयचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला आहे.
इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, त्यांचे खंदे समर्थक व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शाह तसेच गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांच्याविषयी कुठलाही
उल्लेख नसला तरी हे प्रकरण मोदींपर्यंत पोहोचेल, असा भाजपला संशय वाटत आहे. या पाश्र्वभूमीवर आज काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या.
बनावट चकमक घडवून आणणाऱ्या दोषींना शिक्षा मिळालीच पाहिजे, असे मत शिंदे यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केले. इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासून पाहण्यात येत असल्याचे सीबीआयने अहमदाबाद न्यायालयात स्पष्ट केल्यानंतर शिंदे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. इशरतच्या बनावट चकमकीत राजेंद्रकुमार आणि तीन अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा सीबीआयने संशय व्यक्त केला आहे, पण त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.
याप्रकरणी मोदी आणि गुजरात सरकारचे समर्थन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी इशरत जहाँचे अतिरेकी संघटनांशी संबंध होते काय, याची चौकशी करून त्याचा तपशील उघड करण्यात यावा, अशी मागणी केली. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात लष्कर-ए-तैयबा आणि अतिरेक्यांविषयी फारसे भाष्य करण्यात आलेले नाही, याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. २००३ पूर्वी देशभरात सुमारे तीन हजार चकमकी झडल्या. पण राजकीय लाभाखातर केवळ याच प्रकरणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केंद्र सरकारने सीबीआयला गुप्तचर विभागाविरुद्ध उभे केले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा