इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांची ज्यांनी बनावट चकमक रचून हत्या केली, त्यातील दोषींना शिक्षा होणारच, असे निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी दिला. इशरत जहॉं चकमक बनावट होती, असे सीबीआयने बुधवारी अहमदाबादमधील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीमध्ये गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱयांची काय भूमिका होती, याचा तपास सुरू असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. त्यासंदर्भात ‘पीटीआय’शी बोलताना शिंदे यांनी सत्य हे सत्यच असल्याचे म्हटले आहे. दोषींना शिक्षा होणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुप्तवार्ता विभागाचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयकडे पुरेसे पुरावे नसल्याची चर्चा केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱयात आहे. त्या पार्श्वभूमीवरही शिंदे यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सात पोलिस अधिकाऱयांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. गुजरात पोलिस आणि गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱयांनी एकत्रितपणे ही कारवाई केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
राजकीय फायदा घेण्यासाठी अपप्रचार – राजनाथसिंह
दरम्यान, इशरत जहॉं हत्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी गुजरात सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, २००३ पूर्वी देशात तीन हजारांपेक्षा जास्त चकमकी झाल्या. पण केवळ राजकीय फायदा घेण्यासाठीच या चकमकीबद्दल अपप्रचार करण्यात येतो आहे. केंद्र सरकारने सीबीआय आणि गुप्तवार्ता विभागाला आमनेसामने आणले आहे. इशरत जहॉंचा पूर्वइतिहास तपासला पाहिजे. तिचे कोणत्या दहशतवादी संघटनेशी काही संबंध होता का, हे सुद्धा तपासले पाहिजे.
इशरत जहॉं हत्येवरून कॉंग्रेस आणि भाजप आमनेसामने
इशरत जहॉं आणि तिच्या मित्रांची ज्यांनी बनावट चकमक रचून हत्या केली, त्यातील दोषींना शिक्षा होणारच, असे निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी दिला.
First published on: 04-07-2013 at 03:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bjp spar over ishrat jahan fake encounter chargesheet