शरद यादव यांची जोरदार टीका
काँग्रेसने इतक्या वर्षांत आदिवासींसाठी काहीही भरीव कामगिरी केली नाही तर भाजप आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक वृद्धीसाठी असलेले आरक्षणच रद्द करण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव यांनी काँग्रेस आणि भाजपवर केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या जद(यू)ने आता मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा पोटनिवणुकीची तयारी सुरू केली आहे.
रतलाम लोकसभा मतदारसंघात २१ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी जद(यू)ने विजय हारी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आणि भाजपने आतापर्यंत आदिवासींचे एकगठ्ठा मतदान (व्होट बँक) मिळविण्यासाठीच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या विकासाला दोन्ही पक्ष पर्याय ठरू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले. या निवडणुकीसाठी जद(यू)ने भाकप, भाकप (मार्क्सवादी), गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि बहुजन संघर्ष दल यांच्याशी आघाडी केली आहे.