सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणी सोनिया गांधी यांची भेट
सूर्यनेल्ली बलात्कार प्रकरणी ‘क्लीन चीट’ मिळूनही वादग्रस्त ठरलेले राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांच्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर यूपीए सरकार आणि काँग्रेस पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे. भावनेच्या भरात कोणतीही कारवाई करायची नाही, अशी काँग्रेसची अधिकृत भूमिका असली तरी कुरियन यांचे उपसभापतिपदावर राहणे इष्ट ठरणार नाही, असा सूर त्यांचे विरोधक आळवत आहेत. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी कुरियन यांनी या प्रकरणाशी संबंधित दस्तावेजासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी, केंद्रीय मंत्री व्यायलार रवी, काँग्रेसचे प्रवक्ते व संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी. सी. चाको, करुणाकरन गट यांच्यासह केरळमधील बहुसंख्य नेत्यांशी कुरियन यांचे चांगले संबंध नाहीत. बलात्काराच्या आरोपानंतर त्यांनी राज्यसभेच्या उपसभापतिपदी राहू नये, असा काँग्रेसमधील एका गटाचा सूर आहे. पण, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी त्यांच्या बाजूने आहेत. शिवाय ते १०, जनपथच्या विश्वासातील नेते समजले जातात. त्यामुळे सोनिया गांधींसोबत झालेल्या २० मिनिटांच्या भेटीत कुरियन यांना नेमके कोणते निर्देश देण्यात आले, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहेत. कुरियन यांनी उपसभापतिपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे. पण, तसा कुठलाही प्रस्ताव मांडला नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. कुरियन यांनी आपल्या बचावाखातर राज्यसभा सदस्यांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
बलात्काराचा आरोप असलेले कुरियन उपसभापतिपदावर असताना राज्यसभेत बलात्कारविरोधी, महिला सुरक्षा कायदा तसेच महिलांशी संबंधित महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करणे कितपत सयुक्तिक ठरेल, असा सवाल काँग्रेसच्या गोटात उपस्थित केला जात आहे.