पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभरात दौरे करत आहेत आणि बिगर काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, बुधवारी मुंबईत सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची योजनाही सांगितली. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. आगामी काळात आणखी काही प्रादेशिक पक्ष जोडण्याचा त्यांचा डाव असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.
त्रिपुरा निवडणुकीत भाजपाच्या हातून तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांना बुधवारी पश्चिम बंगालच्या बाहेर विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे. मला भाजपाला या देशातून राजकीयदृष्ट्या बाहेर पाहायचे आहे. जर काँग्रेस बंगालमध्ये निवडणूक लढवत असेल तर मी गोव्यात असेच का करू शकत नाही?, असे ममता बॅनर्जी यांनी मुंबईत संवाद साधताना म्हटले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या निवडणुकीच्या मैदानात राहणे आणि भाजपाच्या विरोधात लढणे महत्वाचे आहे, अन्यथा ते तुम्हाला बाद करतील.
“सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र असतील तर भाजपला पराभूत करणे सोपे जाईल. राज्यात परिस्थिती चांगली असली तरी मला बंगालमधून बाहेर पडावे लागले जेणेकरून इतरही बाहेर पडतील आणि त्यांना स्पर्धा करता येईल,” असे ममता म्हणाल्या. ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मंगळवारी ममता बॅनर्जींनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली.
भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कृषी कायदे मागे घेण्याचा केंद्राचा निर्णय तसेच इंधनाच्या किमतीत नुकतीच झालेली कपात ही आगामी निवडणुका लक्षात घेऊन खेळली जाणारी चाल होती.
दरम्यान, यापूर्वी ममता बॅनर्जी गोव्यात गेल्या होत्या, जिथे त्यांनी माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना तृणमूलमध्ये सामील केले आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी बिहार काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद आणि हरियाणाचे नेते आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय अशोक तंवर यांनाही पक्षाचे सदस्यत्व दिले होते. जेडीयूचे पवन वर्मा आणि माजी ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा हे देखील आता टीएमसीचा भाग आहेत.
अशा प्रकारे तृणमूल काँग्रेसने आपला प्रचार सातत्याने पुढे नेला आहे. दुसरीकडे, भाजपाविरोधात काँग्रेस कमकुवत असल्याचे म्हणत सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही भाजपावर उघडपणे हल्लाबोल केला आहे.