कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. परंतु काँग्रेसच्या चिंता अजून संपलेल्या नाहीत. कारण काँग्रेस पक्षश्रेष्टींसमोर एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितलं की, बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये संध्याकाळी ६ वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतल्या पक्षश्रेष्टींवर सोपवतील असं दिसतंय. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज (१४ मे) होण्याची शक्यता तशी कमी आहे. परंतु सर्व आमदारांचं मत पक्षश्रेष्टी जाणून घेतील.
डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. त्यांनी तशी इच्छा वरिष्ठांकडे बोलून दाखवली आहे. हा पेच सुटला नाही तर पक्षातंर्गत संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे बॅनर्स लावले आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा विजय कर्नाटकच्या जनतेला समर्पित केला. यावेळी त्यांनी त्यांच्या आमदारांना आदेश दिला की, आपण (काँग्रेस) निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं लोकांना दिली होती ती पूर्ण करा.
मतमोजणी झाल्यावर सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेसने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. पक्षाला १२० पेक्षा जास्त जागांची अपेक्षा होती असंही ते म्हणाले. दरम्यान, सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र म्हणाला की, माझ्या वडिलांनी आता मुख्यमंत्री व्हायला हवं. यावर डीके शिवकुमार म्हणाले हायकमांड याबाबत निर्णय घेईल.
कर्नाटक जिंकू असं आश्वासन शिवकुमार यांनी सोनिया गांधी यांना दिलं होतं, काल हे आव्हान पूर्ण झालं. यावेळी ते म्हणाले, गेल्या तीन वर्षात नीट झोपलो नाही. शिवकुमार म्हणाले, मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना आश्वासन दिलं होतं की, मी कर्नाटक जिंकेन. तसेच सोनिया गांधी मला तुरुंगात भेटायला आल्या होत्या हे मी विसरू शकत नाही,”.
यावेळी शिवकुमार यांना विचारण्यात आलं की, कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर शिवकुमार म्हणाले, काँग्रेस कार्यालय हे आमच्यासाठी मंदिर आहे. पुढची योजना आता तिथेच ठरवू.
हे ही वाचा >> “पहाटेचा शपथविधी योग्यच होता, कारण…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
सिद्धरामय्या देखील पक्के काँग्रेसी आहेत. १९८९ पासून आतापर्यंत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. सिद्धरामय्यांचं वय आता ७५ वर्ष इतकं आहे. ते म्हणाले होते की, ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना काँग्रेस पक्षश्रेष्ठी याचाही विचार करतील असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेदेखील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा दबक्या अवाजात सुरू आहे. खरगे यांचं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न काँग्रेस यावेळी पूर्ण करू शकते असं म्हटलं जात आहे.