काँग्रेसमधे सध्या अध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहत असून, पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक काँग्रेस नेते इच्छुक असून, यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही समावेश आहे. मात्र राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे अशोक गेहलोत या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आपण काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ नियमाशी सहमत आहोत असं म्हटलं आहे. यामुळे काँग्रेस अध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीला आपलं दुसरं पद सोडावं लागणार हे स्पष्ट झालं आहे.
“आम्ही उदयपूरमध्ये आश्वासन दिलं असून, ते कायम राखलं जाईल अशी आशा आहे,” असं राहुल गांधी केरळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
विश्लेषण: गांधी कुटुंबाबाहेर काँग्रेसचे अध्यक्षपद? थरूर विरुद्ध गेहलोत लढत होणार का?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाची ७१ वर्षीय अशोक गेहलोत यांच्या नावाला पसंती आहे. पण अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपद सोडू इच्छित नाहीत. जर आपण मुख्यमंत्रीपद सोडलं तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट मुख्यमंत्री होतील अशी त्यांना भीती आहे. २०२० मध्ये सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड पुकारुन जवळपास सरकार पाडलं होतं.
राजस्थानमधील उदयपूरमध्ये पार पडलेल्या तीन दिवसीय बैठकीत काँग्रेसने ‘एक व्यक्ती, एक पद’ नियम स्वीकारला होता. या बैठकीत पक्षातील अंतर्गत बदल आणि निवडणुकांर चर्चा झाली होती.
मुख्यमंत्री अशोक गेलहोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, पण…
राहुल गांधी यांचं विधान अशोक गेहलोत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण अशोक गेहलोत यांनी बुधवारी सोनिया गांधींची भेटही घेतली होती. राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना काँग्रेसचं अध्यक्षपद एक वैचारिक पद असल्याची आठवण करुन दिली. “जो कोणी काँग्रेस अध्यक्ष होईल, त्यांनी आपण एक विचारसरणी, विश्वास प्रणाली आणि भारताचा दृष्टीकोन यांचं प्रतिनिधित्व करत आहोत याची जाण ठेवावी”, असं ते म्हणाले.