नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्माच्या आधारावर समाजामध्ये फूट निर्माण करणारा प्रचार केला. धर्मांध प्रचारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असला तरी संपूर्ण प्रचारामध्ये मोदींनी ४००हून अधिकवेळा मंदिर-मशिदीवर भाष्य करून ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा >>> अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपुष्टात; सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान

मोदींनी २२४ वेळी मुस्लीम, अल्पसंख्य, पाकिस्तान अशा शब्दांचा वापर केला. ४२१ वेळा मंदिर-मशिदीचा उल्लेख केला. गेल्या १५ दिवसांमध्ये मोदींनी २३१ वेळा काँग्रेसचा उल्लेख करत टीका केली. ५७३ वेळा ‘इंडिया’ व विरोधकांना लाखोली वाहिली. इतकेच नव्हे तर ७५८ वेळा स्वत:चेच नाव घेतले. पण, मोदींनी महागाई-बेरोजगारी यावर एक शब्ददेखील उच्चारला नाही, अशा शब्दांत खरगेंनी मोदींना लक्ष्य केले.

मोदींच्या धोरणांविरोधात जनतेने मतदान केले असून ४ जून रोजी ‘इंडिया’ आघाडीला बहुमत मिळालेले असेल व मोदी पायउतार होतील. ‘यूपीए’च्या काळातील सरकार सर्वसमावेशक, लोकशाहीवादी व विकासवादी होते. हीच धोरणे ‘इंडिया’चे सरकार सत्तेवर आल्यावर राबवली जातील, असे खरगे म्हणाले. पंतप्रधानपदाचा निर्णय ‘इंडिया’तील घटक पक्ष ठरवतील असेही खरगे म्हणाले.