भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचेच काँग्रेससमोर खरे आव्हान आहे, अशी कबुली केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी येथे दिली. मोदींना दुर्लक्षून चालण्यासारखे नाही, हे सत्य असल्याचेही त्यांनी म्हटले.
एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस मोदींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. देशातील सर्वात प्रबळ विरोधी पक्षाचे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांची दखल घेणे भागच आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस पक्ष मोदींकडे कसा पाहतो ते स्पष्ट केले. एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण मोदींकडे पाहतो तेव्हा त्यांची विचारधारा, तत्त्वज्ञान आणि सार्वजनिक सभांमधील त्यांची भाषा आपल्याला रुचत नसल्याची टीकाही अर्थमंत्र्यांनी या वेळी केली.
अद्याप नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील आश्वासनांचीच भाषा केली आहे. एकाही महत्त्वाच्या मुद्दय़ावर त्यांचे दखलपात्र भाष्य आलेले नाही, असेही चिदम्बरम् म्हणाले. येथील ‘थिंक फेस्ट’मध्ये ते आपले विचार मांडत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जर काँग्रेसला बहुमत मिळाले तर सभागृहाचा नेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे सूत्रे सोपविली जावीत, असे पक्षातील पदाधिकाऱ्यांचे तसेच मंत्र्यांचेही मत असल्याचे त्यांनी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील यावर भाष्य करताना सूचित केले. आता तरुणाईकडे सत्तासूत्रे देण्याची वेळ आली असल्याचे आपले मत असल्याचे चिदम्बरम् यांनी स्पष्ट केले.
आज राहुल गांधी अनेक सभांना संबोधित करीत आहेत, जर एक सल्लागार म्हणून माझ्यावर काही सुचवायची वेळ आलीच तर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले मत त्यांनी स्पष्टपणे व्यक्त करायला हवे, असेही चिदम्बरम् यांनी सांगितले.
* पंतप्रधानांचा जनतेशी अपेक्षेइतका संवाद नाही.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जनतेशी संवाद का साधत नाहीत, ते महत्त्वाच्या विषयांवरील आपली मते उघडपणे व्यक्त का करीत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थमंत्री चिदम्बरम् यांनी पंतप्रधान संवाद साधतात असे सांगितले. मात्र पत्रकार परिषदा आणि थेट सभा यांच्या माध्यमातून ते आपल्या अपेक्षेइतका संवाद साधत नाहीत, अशी आपली नाराजीही या वेळी व्यक्त केली.