सत्ताधारी भारतीय पक्षाचे समर्थक आणि योगगुरू बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफीझ सईद याची भेट घेतल्याच्या बातमीमुळे संसदेचे कामकाज विरोधकांनी बंद पाडले. वैदिक हे भारत सरकारचे दूत म्हणून हाफीझ सईद याला भेटले असा आक्षेप विरोधकांनी घेतला. तसेच सरकारने याबाबत आपली भूमिका मांडणारे निवेदन द्यावे अशी मागणीही विरोधकांनी केली.
वैदिक यांनी सईद याची भेट घेतल्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्यामुळे विरोधक संतप्त झाले होते. वैदिक यांची पाश्र्वभूमी तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी असलेले त्यांचे संबंध लक्षात घेता भाजपप्रणीत रालोआ सरकारनेच त्यांना सईद याच्या भेटीसाठी धाडले होते असा आक्षेप विरोधकांनी घेतला.
राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासातच कामकाजात विरोधकांनी व्यत्यय आणला आणि कामकाज दोन वेळा तहकूब करण्यास भाग पाडले. भारताच्या दृष्टीने ‘मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या’ यादीत असलेल्या सईद आणि वैदिक यांच्या भेटीमागील हेतू आणि कारण सरकारने लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली.
सरकारची परवानगी होती काय?
हाफीझ सईद या दहशतवाद्याची भेट घेण्यापूर्वी वैदिक यांनी सरकारची परवानगी घेतली होती काय, अशी पृच्छा राज्यसभेत काँग्रेसच्या खासदारांनी केली.दिग्विजय सिंग यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात हा प्रश्न उपस्थित करीत गोंधळाला सुरुवात केली. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी हा विषय प्रश्नोत्तरांच्या तासातील नाही, असे सांगत परवानगी नाकारली.
पंतप्रधान कार्यालयावर टीका
मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद आणि पत्रकार वेद प्रताप वैदीक यांच्या भेटीमागे पंतप्रधान कार्यालयाचा थेट संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला. वैदीक हे संघ परिवाराला जवळचे आहेत. त्यामुळे आमच्या या भेटीशी काही संबंध नाही हा सरकारचा युक्तिवाद पटणारा नाही असे शकील अहमद म्हणाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा