पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने रेल्वे सुरक्षिततेसंबंधीच्या मूलभूत मुद्दय़ांवर संपूर्ण तडजोड केली, असा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला. ओडिशामधील बालासोर येथे गेल्या महिन्यात झालेला रेल्वे अपघात मानवी चुकीमुळे झाला होता. व्यवस्थापन आणि राजकीय नेतृत्वाचे अपयश त्याला कारणीभूत होते अशी टीका काँग्रेसने केली.
सिग्नल यंत्रणेतील चुकीमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष अपघाताची चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय चौकशीने काढला आहे. सिग्निलग आणि दूरसंचार (एस अँड टी) विभागामध्ये अनेक स्तरांवर झालेल्या चुकांवर त्यामध्ये बोट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या चुका नोंदवल्या गेल्या असत्या तर बालासोरचा अपघात टाळता आला असता, असेही या चौकशी अहवालात सुचवण्यात आले आहे.
या अहवालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ‘आम्ही इतके दिवस हेच सांगत होतो. वंदे भारतच्या उद्घाटनाचा खुळेपणा, बुलेट ट्रेनचा सोस यामध्ये मोदी सरकारने रेल्वेच्या मूलभूत सुरक्षा मुद्दय़ांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे’. जिथे फोटो काढण्याची संधी नसते आणि बातम्यांच्या मथळय़ांमध्ये नाव येत नाही त्यामध्ये मोदींना रस नसतो, असा आरोपही रमेश यांनी केला.