Starlink’s Deal With Airtel And Jio: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही परस्पर कर आकारण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. अशात भारतीय दूरसंचार कंपन्या एअरटेल आणि जिओने ‘स्टारलिंक’ (स्पेसएक्स) सोबत केलेल्या भागीदारीच्या घोषणेचा संदर्भ देत, काँग्रेसने गुरुवारी दावा केला की हे करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीने झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चांगले नाते निर्माण व्हावे यासाठी हे सर्व करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
जे एकेकाळी विरोध करत होते…
याबाबत बोलताना काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जयराम रमेश यांना आश्चर्य व्यक्त केले असून, त्यांनी म्हटले की, “जिओ आणि एअरटेल १२ तासांच्या आत स्टारलिंकसोबत भागीदारीची घोषणा कशी करू शकतात. ज्या कंपनीला ते एकेकाळी विरोध करत होते त्या कंपनीचे भारतीय बाजारपेठेत कसे स्वागत करू शकतात.”
एएनआय या वृत्तसंस्थोशी बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “या दोन्ही कंपन्या स्टारलिंकच्या भारत प्रवेशाला विरोध करत होत्या. कारण स्टारलिंकलाही स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभागी व्हायचे होते. जे २०१४ पासून भारत सरकारचे धोरण आहे.”
एलॉन मस्क यांचे व्यावसायिक हितसंबंध
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेले जयराम रमेश यांनी पुढे असा आरोप केला की, “स्टारलिंकची भारतीय कंपन्यांसोबतची भागीदारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी केली आहे. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक एलॉन मस्क यांचे व्यावसायिक हितसंबंध सुलभ झाले आहेत.”
मस्क यांना खुश ठेवले की…
“एअरटेल आणि जिओने स्टारलिंकसोबत करार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी मस्क यांच्या माध्यमातून ट्रम्प यांच्याशी शांतता निर्माण करण्यासाठी घेतला आहे. दररोज, ट्रम्प घोषणा करतात की, भारत अमेरिकेचे आयात शुल्क कमी करत आहे. आम्हाला माहित नाही की परिस्थिती काय आहे, भारताने कशावर सहमती दर्शविली आहे. परंतु हे स्पष्ट आहे की, स्टारलिंकसोबतचा हा करार मैत्री खरेदी करण्याचा प्रकार आहे. पंतप्रधानांना वाटते की, त्यांनी मस्क यांना खुश ठेवले की ट्रम्पही खुश होतील,” असे रमेश पुढे म्हणाले.