पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारने भारतीय रेल्वेचा ‘विनाश’ केल्याचा आरोप करत काँग्रेसने मंगळवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कांचनगंगा रेल्वे अपघातानंतर वैष्णव यांना रेल्वे मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. वैष्णव दुचाकीवर बसून अपघातस्थळी पोहोचल्याबद्दल काँग्रेसने वैष्णव यांना टोला लगावत हे रेल्वेमंत्री आहेत की ‘रीलमंत्री’ असा संतप्त सवालही केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, जेव्हा रेल्वे अपघात होतात, तेव्हा मोदी सरकारचे रेल्वे मंत्री कॅमेऱ्यांच्या झगमगाटात घटनास्थळी पोहोचतात आणि सर्वकाही ठीक असल्यासारखे वागतात. या रेल्वे अपघाताबद्दल कोणाला जबाबदार धरायचे ते सांगा, रेल्वे मंत्री की तुम्हाला? असा सवालही खरगे यांनी नरेंद्र मोदींना केला. खरगे यांनी सरकारला सात प्रश्न करून त्याची उत्तरे मागितली आहेत.

बालासोर येथील मोठ्या रेल्वे दुर्घटनेनंतर बहुचर्चित टक्करविरोधी ‘कवच’ यंत्रणा एक किलोमीटर मार्गावरही का जोडली गेली नाही, असा सवाल खरगे यांनी केला. रेल्वेमध्ये ३ लाख पदे रिक्त का आहेत, गेल्या १० वर्षांत ही रिक्तपदे का भरली गेली नाहीत. मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे ‘लोको पायलट’चे लांबलेले कामाचे तास हे अपघातांच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण असल्याचे खुद्द रेल्वे बोर्डाने मान्य केले आहे. तरीही ही रिक्त पदे का भरण्यात आली नाहीत, असा सवालही त्यांनी केला. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२२च्या अहवालानुसार २०१७ ते २०२१ या काळात विविध रेल्वे अपघातांत सुमारे एक लाख नागरिकांचा मृत्यू झाला, याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही खरगे यांनी केला.

हेही वाचा >>>भारत-तैवान मैत्रीवर चीनचा जळफळाट? तैवानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि आमचे राष्ट्रपती घाबरणार नाहीत”

अपघातांची जबाबदारी कोण घेणार?

२०१४ ते २०२३ या काळात आतापर्यंत १,११७ रेल्वे अपघात झाले, म्हणजे दर तीन दिवसाला एक अपघात होतो. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत केला. यापूर्वीच्या रेल्वे मंत्र्यांनी अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पण येथे एक मंत्री आहे जो दु:खाच्या काळातही रील काढण्याची संधी सोडत नाही. हे भारताचे ‘रीलमंत्री’ आहेत, अशी टीकाही श्रीनेत यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress criticizes ashwini vaishnav railway minister or reel minister over series of accidents amy
Show comments