पीटीआय, नवी दिल्ली
सरकार एका विशिष्ट समाजाच्या जमिनीकडे पहात असून सध्याच्या वक्फ कायद्यात सुधारणा झाल्यास देशात खटल्यांची संख्या वाढणार असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी संसदेत वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेला प्रारंभ करताना केला. यासोबतच या विधेयकात सुधारणेची गरज आहेच पण त्यास विरोध नसल्याचेदेखील गोगोई म्हणाले.
विधेयकातील सुधारणा कायदा मजबूत करण्यासाठी असायला हव्या परंतु या विधेयकामुळे देशात समस्या वाढतील, असे लोकसभेत काँग्रेसचे उपनेते गोगोई म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांच्यावर सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही केला. या विधेयकावर सविस्तर चर्चा झाल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा दावा त्यांनी खोडून काढला. यावेळी वक्फ सुधारणा विधेयकावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.
सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
● लोकसभेत तुमचे किती अल्पसंख्यक खासदार आहेत, यावरून तुमच्या मनात मुस्लिमांबद्दल किती सहानुभूती आहे हे कळेल?, अशा शब्दांत गोगोई यांनी हल्लाबोल केला.
● नोव्हेंबर २०२३ पर्यंत नवीन विधेयक आणण्याची गरज आहे हे मंत्रालयाने समजूनच घेतले नाही. जितक्या वेळा बैठका झाल्या त्यापैकी एकाही बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चाच झाली नाही.
● संयुक्त संसदीय समितीने सर्वांचे मत जाणून घेतल्याचे सांगितले जाते परंतु विरोधकांनी सुचविलेली एकही दुरुस्ती स्वीकारण्यात आली नसल्याचा दावादेखील त्यांनी केला.
– ज्या समाजाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, १८५७मध्ये मंगल पांडे यांच्या हौतात्म्याला, भारत छोडो आंदोलन, दांडीयात्रेला पाठिंबा दिला, भारताच्या फाळणीला विरोध केला अशा समाजाला तुम्ही कलंकित करत आहात, असा आरोप गोगोई यांनी केला.
हे विधेयक संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला आहे. हे विधेयक आणण्यामागे संविधान कमकुवत करणे, भ्रम पसरविणे, अल्पसंख्यक समाजाला अपमानित करणे तसेच भारतीय समाजाला विभाजित करण्याचा हेतू आहे. – तरुण गोगोई, उपनेते काँग्रेस, लोकसभा