भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते पोर्ट लुईस येथे पोहोचले. उद्या, १२ मार्च रोजी होणाऱ्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात भारतीय नौदलाच्या जहाजासह भारतीय संरक्षण दलांची एक तुकडीही सहभागी होणार आहे.

दरम्यान आज (मंगळवारी) काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्यावर टीका केली आणि म्हटले की, मणिपूरचे लोक त्यांच्या भेटीची वाट पाहत आहेत. तसेच देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने असा दावा केला की, पंतप्रधानांनी जवळजवळ दोन वर्षे मणिपूरला भेट देणे टाळले असून, हा खरोखरच मणिपूरच्या जनतेचा अपमान आहे.

पंतप्रधानांचे प्राधान्य…

याचबरोबर काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक मीम पोस्ट करत, “पंतप्रधान मोदी यांचे प्राध्यान्य मणिपूर नसून मॉरिशस आहे”, असे म्हटले आहे.

हा त्यांचा अपमान आहे

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश म्हणाले, “पंतप्रधान आता मॉरिशसला जात आहेत. परंतु मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही परिस्थिती तणावपूर्ण आहे. मणिपूरचे लोक पंतप्रधानांच्या भेटीची वाट पाहत आहेत,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “जवळजवळ दोन वर्षांपासून पंतप्रधानांनी मणिपूरला भेट देणे टाळले आहे. हा खरोखरच त्यांचा अपमान आहे,” असे रमेश पुढे म्हणाले.

काँग्रेस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणावग्रस्त मणिपूरला भेट न दिल्याबद्दल तसेच वांशिक संघर्षग्रस्त राज्यातील परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्याबद्दल केंद्र सरकारवर सतत टीका करत आहे.

दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची धग अजूनही जनतेला सोसावी लागत आहे. काल मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी संघर्ष झाल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण झाली. या संघर्षामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून २५ जण जखमी झाले. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव लालगौथासिंह सिंगसिट असे असल्याची माहिती देण्यात आली. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.